आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

ईडीची अंतरिम जामिनाविरुद्धची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या अंतरिम जामिनाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ईडीने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, ईडीची याचिका गुरुवारी फेटाळनाता उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवला.  सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठाने ईडीच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवत ईडीची याचिका फेटाळली.

आझम खान यांच्यावरील हे मनी लाँड्रिंग प्रकरण दोन पॅन कार्ड बाळगल्याच्या आरोपांशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. ईडीचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, ईडी आरोपीला अटकेसाठी आवश्यक कारणे देण्यात अपयशी ठरली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी आझम खान यांचे प्रतिनिधित्व केले. 17 नोव्हेंबर 2026 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आझम खान यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर बुधवारी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली होती. ईडीने आझम खान यांना या प्रकरणात 31 ऑक्टोबर 2026 रोजी अटक केली होती.

Comments are closed.