गुजरातविरुद्ध ‘ती’ एक चूक अन् सामना हातातून निसटला; रियान परागने त्यांच्यावर खापर फोडून हात वर
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स क्वालिफायर 2 IPL 2026 : आयपीएल 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. गुजरात टायटन्सविरुद्ध 214 धावांचे मोठे लक्ष्य उभे करूनही राजस्थानला विजय मिळवता आला नाही. शुभमन गिलच्या शानदार शतकाच्या आणि साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने 7 विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार रियान परागने पराभवाची कारणे स्पष्ट करताना संघाकडून झालेली मोठी चूक मान्य केली. त्याच्या मते, 214 धावांचा स्कोअर बचाव करण्यासारखा होता, मात्र काही महत्त्वाच्या टप्प्यांवर संघ मागे पडला.
“240 धावा झाल्या असत्या तर चित्र वेगळं असतं…” (Riyan Parag GT vs RR IPL 2026 Qualifier 2)
पराग म्हणाला, “पहिल्या डावात खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती. चेंडूला ग्रिप मिळत होती. मात्र दुसऱ्या डावात जड रोलरमुळे फलंदाजीसाठी परिस्थिती अधिक चांगली झाली. मला वाटतं 240 धावांच्या आसपासचा स्कोअर असता, तर गुजरातसाठी आव्हान खूप मोठं ठरलं असतं.” त्याने पुढे सांगितले की, संघाला सलामीवीरांकडून अपेक्षित योगदान मिळाले नाही. त्यामुळे मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव आला आणि राजस्थानला अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर समाधान मानावे लागले.
युवा संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली (Riyan Parag Reflects on Defeat Against Gujarat Titans)
राजस्थानच्या या हंगामाबद्दल बोलताना परागने आपल्या युवा खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला, “आमच्या संघात अनेक युवा आणि अनुभवहीन खेळाडू होते. हंगामाच्या सुरुवातीला प्लेऑफपर्यंत पोहोचू, अशी फारशी अपेक्षा नव्हती. पण या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढले आणि भविष्यात ते आणखी सक्षम होतील.” राजस्थानने लीग टप्प्यातील अखेरचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या विजयामुळेच त्यांचा पुढील प्रवास शक्य झाला होता.
वैभव सूर्यवंशी GT वि RR IPL 2026 क्वालिफायर 2
या सामन्यात राजस्थानसाठी सर्वात मोठा सकारात्मक मुद्दा म्हणजे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज खेळी. वैभवने केवळ 47 चेंडूत 96 धावांची वादळी खेळी करत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
चिन अप, वैभव सूर्यवंशी! 🩷
🥹 तुम्हाला अभिमान वाटावा असे खूप काही आहे
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #क्वालिफायर2 | #The FinalLeap | #GTvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/8lHU927KLE
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 29 मे 2026
वैभवबद्दल बोलताना पराग म्हणाला, “त्याच्या फलंदाजीचं वर्णन शब्दांत करणं कठीण आहे. अनेक खेळाडू मोठे फटके मारून धावा करतात, पण वैभवची शैली वेगळी आहे. तो प्रत्येक फटका विचारपूर्वक खेळतो. आजची त्याची खेळी पाहिली असेलच. त्याच्यात प्रचंड क्षमता आहे. भविष्यात तो राजस्थान रॉयल्ससाठी मोठी कामगिरी करेल आणि आम्हाला दुसरे आयपीएल विजेतेपद जिंकून देईल, अशी आशा आहे.”
राजस्थानचे स्वप्न अधुरे (RCB vs GT IPL Final 2026)
214 धावांचा मजबूत डोंगर उभा करूनही राजस्थानच्या गोलंदाजांना गुजरातच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. शुभमन गिलच्या 104 धावांच्या शतकी खेळीने आणि साई सुदर्शनच्या 58 धावांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे गुजरातने लक्ष्य सहज गाठले. त्यामुळे राजस्थानचा आयपीएल 2026 मधील प्रवास दुसऱ्या क्वालिफायरमध्येच संपुष्टात आला, तर गुजरातने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.