हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! पंचनामे न करता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा; रोहित पवारां


रोहित पवार: राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी (Heavy Rain) लावली आहे. मराठवाड्यासह जळगावअहिलीनगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मराठवाड्यातील ७५ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पावसाने ५ जणांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला. पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित केले जात आहे. पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा असणार आहे. तसेच, शुक्रवारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे, या मुसळधार पावसाने  (Heavy Rain) मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं आहे.

Rohit Pawar Post: काय म्हणालेत रोहित पवार पोस्टमध्ये

त्यांनी याबाबतची पोस्ट त्यांच्या सोशल मिडीयावरती शेअर करत शेतकऱ्यांना मदत करावी असं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून #माणुसकी_धर्माला आणि #महाराष्ट्र_धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे. आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत #ओला_दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच #योग्य_वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती!”, असं म्हटलं आहे.

Dharashiv Heavy Rain: धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळंब तालुक्यात मांजरा नदीला पूर आला असून, नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले आहे. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मांजरा नदीच्या पुराची भीषणता ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसत आहे. या दृश्यांमध्ये शेतात पाणी साचलेले आणि पिके पाण्याखाली गेलेली दिसत आहेत. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला असून, नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे परिसरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. शेतीचे झालेले नुकसान हे शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Beed Heavy Rain: बीड जिल्ह्याला मोठा फटका

मराठवाड्यात जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला. शेती आणि घरं पाण्याखाली गेली, एनडीआरएफने नागरिकांना बाहेर काढले. माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढल्याने रात्री एक वाजता धरणाचे आणखी सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. आता एकूण अकरा दरवाज्यांमधून एक लाख पंधरा हजार दोनशे त्रेचाळीस क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सिंदफणा नदीला महापूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन. माजलगावचा हायवे पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता. जायकवाडी धरणातून येणाऱ्या पाण्याने विसर्ग वाढवला. पूरस्थितीवर एका मंत्र्याने प्रतिक्रिया दिली. त्यांनी मदतीसाठी पंचनाम्याचे अहवाल तत्काळ पाठवण्याचे आदेश. “आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून तुम्हाला काय यातना होत असतील, हे मी कल्पनाच नाही करू शकत,” असे ते म्हणाले. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलून उपाययोजना करण्यासाठी मुंबईत आल्याचे आणि लवकरच जिल्ह्यात परतणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.