अजित दादांनी झापलं,शेकडो कोटींचं कंत्राट रद्दवरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीचा किस्सा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार (Ajit pawar) यांच्या बारामती विमान दुर्घटनेवरुन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच, अजित दादांचा मृत्यू हे अपघाती निधन असण्यापेक्षा घातपात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला असून याची चौकशी राष्ट्रीयस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीजकडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर, दिल्लीतही रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अपघाताच्या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, शेकडो कोटींच्या कंत्राटावरुन वाद विवाद झाल्याने उशीर झाल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. तसेच, बारामतीतही नरेश अरोरा यांच्या लोकांना दादांनी झापल्याचंही त्यांनी सांगितलं.

अजित दादा जर गाडीने गेले असते तर दुर्देवी घटना घडली नसती. त्यामुळे, काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत. फाईल मुद्दामहून आणली गेली का? दादांनी फाईलवर सही केली, त्यानंतर 7.13 वाजता विमानांचे बुकींग झाले. मी कोणावरही प्रश्न उपस्थित केले नाहीत, पण याचा तपास व्हावा, जे खरं आहे मी तिथे बोललो, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

27 तारखेला तटकरे म्हणताहेत की मी तिथे आलो उशीरपर्यंत थांबलो, एखाद्या पॅालिटिकल कन्सल्टंटची तिथे चर्चा झाली. दादाकडून त्या व्यक्तीचे शेकडो कोटीचे कंत्राट रद्द केले जाणार होते, त्यावरून वाद विवाद झाला म्हणून उशीर झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. आम्ही पुण्यात बारामती हॅास्टेलला बसलो होतो, तेंव्हा नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापले होते. नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला तेवढे पैसे द्यायला पाहीजे होते, असा काही नेत्यांचा आग्रह होता. कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे, असे म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटवरुन सुनिल तटकरेंकडे कंत्राटवरुन बोट दाखवले आहे.

प्रमोद हिंदुरावांच्या व्हिडिओवरही भाष्य

रोहित पवार यांनी प्रमोद हिंदुराव यांच्या व्हिडिओबद्दलही भाष्य केलं. प्रमोद हिंदुराव यांनी सांगितलं की, प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला. त्यामुळे फाईल आणण्यासाठी उशीर झाला. दादांच्या बाजूनं कोणीतरी बोलायला आलं याचा आनंद आहे. मागील काही दिवसापासून काही नेते दादांच्या बाजूनं बोलत नव्हते, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.

दिल्लीता जाऊन मोदी-शाहांना भेटता आले नाही

सत्तेत नसतानाही अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, मला वेळ मिळाली नाही. परंतु, ई-मेलच्या माध्यमातून पत्र लिहणार आहे. विरोधात असतानाही आम्ही लढतोय, पण जे सत्तेत आहेत ते बोलत नाही. संसद सुरू अससल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, विमान उड्डाणमंत्री यांनी वेळ दिला नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले. मोदी आणि अमित शाह यांना काकी भेटल्या, पार्थ जय होते. मी अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून जो काही अपघात झालाय तो घातपात होता की अपघात होता हाच मुद्दा मांडला असावा. तपास यासाठी व्हायला पाहिजे की ब्लॅक बॅाक्समध्ये काहीच मिळालं नाही. रेकॅार्डींग काहीच मिळालं नाही, अशी फालतू कारणं महाराष्ट्र ऐकणार नाही. अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, याकडे नेत्यांचे लक्ष नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असेही रोहित पवार यांनी म्हटले. यात क्रिमिनल इन्वेस्टीगेशन व्हायला पाहीजे, पारदर्शक पद्धतीने तपास व्हायला पाहीजे. ब्लॅक बॅाक्स बंद करता येत नाही. पण, काहीजण म्हणत असतील की ब्लॅकबॅाक्स बंद आहे, तर मी केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले असं होईल, असे म्हणत रोहित पवार यांनी आपली भूमिका मांडली. डीजीसीएनं तपास सुरू केला आहे, परंतु एका महिन्यांत इंटरनॅशनल एजन्सीद्वारे तपास व्हावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

हेही वाचा

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अजितदादांसोबत काय बोलणं झालेलं?; सुप्रिया सुळेंनी अखेर मनातलं सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.