MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
मुंबई : देशभरात नीट पेपरफुटीवरुन (NEET) संताप व्यक्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकीकडे ही घटना ताजी असतानाच आता राज्यात MPSC परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. औषध निरीक्षक म्हणजे फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टरपदासाठीचा पेपर फुटल्याचे सांगत त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची भेट घेतली. औषध निरीक्षक पदाच्या परिक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध मर्यादेत चौकशी करण्याची विनंती त्यांच्याकडे केली, तसेच याबाबतचं निवेदनही त्यांना दिलं.
पेपरफुटीचा हा संबंधित विषय MPSC आयोगाच्या अखत्यारित येत असल्याने याबाबतची सर्व कागदपत्रे आयोगाकडे सोपवण्यात येतील आणि आयोग याबाबत नक्कीच योग्य कारवाई करेल, असे आश्वासन तुकाराम मुंढेंनी दिल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं. 22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक (Advertisement No. 16/2025) पदासाठीच्या परीक्षेबाबत विविध तक्रारी, उपलब्ध डिजिटल पुरावे तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या माहितीवरून सदर परीक्षेत अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गैरव्यवहार झाल्याची शंका निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी कथित प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसारित झाल्याचे आरोप आहेत. तसेच प्रश्नपत्रिकेचा लीक झालेला कथित मजकूर व प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न यामध्ये लक्षणीय साम्य असल्याचे आरोप समोर आले आहेत, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी निवेदनात दिली आहे.
संबंधित प्रश्नपत्रिकेबाबत “100 पैकी 90 प्रश्न जुळले” आणि “मोबाईलवरून नक्कल” अशा स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. तसेच ज्या उमेदवारास दि. 20 मार्च 2026 रोजी सदर परीक्षेतील प्रश्नाचे फोटो पाठवण्यात आले त्या उमेदवारास परीक्षेत उच्च गुण प्राप्त झाल्याचे देखील समोर आले आहे. सदर प्रकरणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात सदर भरती प्रक्रियेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सदर सर्व बाबी लक्षात घेता सदर भरती प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी. तसेच सदर भरती प्रक्रियेतील नियुक्त्या व पुढील कार्यवाही स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ स्थगित करण्यात यावी. तसेच सदर परीक्षेतील गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता सदर परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करत तुकाराम मुंढेंनीही यात लक्ष घालावे, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
एमपीएससीकडून तपास सुरू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती प्रक्रियेत पेपर फुटल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने स्वतः ई-मेल पाठवून कोणतीही तक्रार नसल्याचं कळवलं आहे. तसेच या प्रकरणात आता रीतसर पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार असून एमपीएससीकडून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती महेंद्र हरपाळकर यांनी दिली.
हेही वाचा
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला? आता रीतसर गुन्हा दाखल होणार, एमपीएससीकडून मोठी माहिती
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Comments are closed.