धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि आता रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीतील तिसरा राजीनामा
मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे (Ashok Kharat) अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांना (Rupali Chakankar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षापदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावं लागणार असल्याची माहिती आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीतील हा तिसरा राजीनामा आहे. या आधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नाशिकच्या अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. एका व्हिडीओमध्ये चाकणकर या नराधम अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओत त्यांनी खरातची तुलना विठ्ठलाशी केली आहे. चाकणकर आणि खरातचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यावरुन अशोक खरातच्या काळ्या कृत्यांना चाकणकरांचा वरदहस्त आहे का अशी चर्चा सुरू झाली.
Dhananjay Munde Resignation : आधी धनंजय मुंडेंचा राजीनामा
महायुतीचं सरकार सत्तेत येऊन दीड वर्षही झालं नाही, मात्र या काळात राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांचे राजीनामे झाले. सर्वात आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर आलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला. अखेर 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण देत, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
Manikrao Kokate Resignation : माणिकरावर कोकाटेंचा राजीनामा
धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे 18 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी हा राजीनामा दिला.
Rupali Chakankar Resignation : आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा
धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन बड्या नेत्यांनंतर आता रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो. त्यामुळे हे पद अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबत रुपाली चाकणकरांना आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावं लागणार आहे. तसे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भोंदूबाबाच्या नादी लागल्याने रुपाली चाकणकरांना दुसरंही पद गमवावं लागणार आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.