महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हाता
रुपाली चाकणकर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी महिलांच्या सुरक्षा, संरक्षण आणि आत्मनिर्भरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील मानसिकतेत बदल होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “आज व्यासपीठावर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. महिलांच्या कर्तृत्वाची कहाणी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक महिला दिन साजरा केला जातो.”
त्या पुढे म्हणाल्या की, आज पुरुषही महिला दिन साजरा करताना दिसतात; मात्र खऱ्या अर्थाने बदल तेव्हाच होईल जेव्हा पुरुषी मानसिकता बदललेली दिसेल. “महिलांची लढाई आम्ही लढतच राहू, पण जेव्हा पुरुष बांधव आमच्या अस्तित्वासाठी पुढे येतात तेव्हा ही लढाई जिंकण्यासाठी अधिक बळ मिळते,” असेही त्यांनी नमूद केले.
Rupali Chakankar: विवाहपूर्व समुपदेशनासाठी राज्यभरात 10 केंद्रे
महिलांच्या सामाजिक आणि कौटुंबिक सक्षमीकरणासाठी आयोगाने विविध उपक्रम राबवले असल्याची माहितीही त्यांनी दिली. विवाहपूर्व समुपदेशनासाठी राज्यभरात 10 केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यामध्ये तरुण-तरुणींना विवाहपूर्व मार्गदर्शन केले जाते. तसेच विधवा महिलांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना हळदी-कुंकू कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. काही ग्रामपंचायतींना याबाबत प्रमाणपत्रही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Rupali Chakankar: 72 महिलांची तस्करीतून सुटका
मानवी तस्करीच्या विरोधातही महिला आयोगाने मोहीम राबवली असल्याची माहिती चाकणकर यांनी दिली. “गेल्या वर्षी आम्ही 72 महिलांची तस्करीतून सुटका केली. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींचा या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बळी जात असल्याचे दिसून येते आणि या मागे मोठे जाळे कार्यरत आहे,” असे त्या म्हणाल्या.
Rupali Chakankar: मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या
समाजातील महिलांना संविधानाची जाणीव होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आपण महिलांना पोथ्या-पुराणात अधिक अडकवले, पण संविधान वाचणे आपल्याकडून राहिले. मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.
Rupali Chakankar: स्त्रीबीज विक्री प्रकरणात मोठी कारवाई
महिलांच्या सुरक्षेसाठी विविध संस्थांमध्ये आयसी (Internal Committee) बोर्ड आहे का, याची खात्री करा, तसेच मोबाईलमधील पॅनिक बटण तपासून ठेवा, असेही त्यांनी सांगितले. बदलापूर येथे स्त्रीबीज विक्री प्रकरणावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून ठाणे, जळगाव आणि नाशिकमध्येही संबंधित प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मालती नर्सिंग होमवरही कारवाई करून ते बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Rupali Chakankar: महिला आयोगातर्फे सायबर वेलनेस सेंटर सुरू
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना चाकणकर म्हणाल्या की, राज्यात 12 कोटी 71 लाख लोकांकडे मोबाईल फोन आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होतो. मात्र त्यासोबतच ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी महिला आयोगातर्फे सायबर वेलनेस सेंटर सुरू करण्यात आले असून देशातील असे पहिले केंद्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Rupali Chakankar: महिला आयोगात सध्या केवळ 17 कर्मचारी
यावेळी महिला आयोगातील मनुष्यबळाच्या कमतरतेकडेही त्यांनी लक्ष वेधले. “आयोगात सध्या केवळ 17 कर्मचारी कार्यरत आहेत. बसण्याच्या सुविधाही अपुऱ्या आहेत. आयोगाच्या आकृतिबंधाला गेल्या महिन्यात मंजुरी मिळाली असली तरी तो अद्याप प्रत्यक्षात लागू झालेला नाही,” असे त्यांनी सांगितले.
Rupali Chakankar: तक्रारींसाठी महिला आयोगाचे ऑनलाइन पोर्टल सुरु होणार
तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी लवकरच महिला आयोगाचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पोर्टलद्वारे राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून महिला तक्रार नोंदवू शकतील. तसेच एखाद्या महिलेला त्रास होत असल्यास तिचा भाऊ किंवा नातेवाईकही तक्रार करू शकतील. तक्रार दाखल झाल्यानंतर ती कोणत्या ठिकाणी नोंद झाली आहे याबाबत संबंधितांना संदेशही पाठवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.