संगमेश्वर तालुक्याचा टंचाई आराखडा तयार; तालुक्यातील १६५ गावांची तहान भागविण्यासाठी २६ कोटी ६४ लाख निधीची आवश्यकता
यंदा पावसाने अपेक्षित सरासरी न गाठल्याने संगमेश्वर तालुक्यासमोर आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा तालुक्यात सरासरी पर्जन्यमानात तब्बल ३५ टक्के घट झाली असून, तालुका दुष्काळग्रस्तही जाहीर झाला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत तालुक्यातील १६५ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने तब्बल २६ कोटी ६४ लाख रुपयांच्या विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण घटल्याने तालुक्यातील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विहिरी, विंधन विहिरी तसेच नद्या आणि नाल्यांमधील पाणीसाठा कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंचायत समिती प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन सुरू केले आहे.
पाणीटंचाई निवारण आराखड्यामध्ये नवीन पाणीस्रोत निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यात ४६० विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच ६५ गावांमधील २७४ नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या योजनांची दुरुस्ती झाल्यास संबंधित गावांमधील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १२४ गावांमध्ये एकूण ४०२ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विहिरींची कामे, नदीपात्रातील गाळ काढणे तसेच पाणीसाठा वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून, त्यासाठी शासनाकडे २६ कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तालुक्यातील ७२ गावांना पाणीटंचाईच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली आहे. त्यामुळे या गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा भूजलपातळी वाढविण्यासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यात यंदा १२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९०० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित बंधारे पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार असून, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही हातभार लागणार आहे.
एकीकडे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे उपाययोजनांसाठी आवश्यक असलेला २६ कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला वेळेत मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाला, तरच नियोजित कामांना गती मिळू शकणार आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी शासनाकडून किती लवकर निर्णय घेतला जातो, याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी साधारण एक ते दोन कोटी रुपयांचा आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा पावसातील मोठी घट आणि संभाव्य पाणीटंचाईची व्याप्ती लक्षात घेता तब्बल २६ कोटी ६४ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा आराखडा कितीतरी पटीने मोठा असल्याने तालुक्यातील पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित झाली आहे. एवढ्या मोठ्या निधीच्या प्रस्तावाला शासन किती लवकर मंजुरी देते, याकडे आता लक्ष लागले आहे.
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले आहे. तालुक्यातील १६५ गावांमधील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी २६ कोटी ६४ लाख रुपयांचा आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी, नळपाणी योजनांची दुरुस्ती, विहिरी व नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामांचा समावेश आहे. तसेच पावसाचे पाणी अडविण्यासाठी १२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ९०० बंधारे पूर्ण झाले आहेत. नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
– अक्षय पाटील, गटविकास अधिकारी पं.स. संगमेश्वर
Comments are closed.