डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट; संजय राऊत यांचा हल्लाबोल
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची तयारी केली असून येत्या 30 नोव्हेंबर पासून लोकसभा आणि 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे अधिवेशन घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारचा हा खटाटोप असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दात निशाणा साधला. डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी भाजपने रचलेला कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांनाही त्यांनी गद्दार म्हटले आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. अन्यथा राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत:
शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ असल्याने संघर्ष आणि निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत,
नाहीतर राष्ट्रद्रोही डिलिमिटेशन बिल
अशा भ्रष्ट पद्धतीने संसदेत आणण्याचे धाडस झाले नसते:डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट आहे.
जो कोणी याला पाठिंबा देईल, तो देशाच्या जनतेशी विश्वासघात करत आहे… ते २१व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील!
म्हणून प्रत्येक देश प्रेमी लोकशाही वादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे.
“इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो;
गद्दारी बाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात ”
@PawarSpeaks
@narendramodi
@BJP4महाराष्ट्र— संजय राऊत (@rautsanjay61) 27 नोव्हेंबर 2026
डिलिमिटेशन हा देशाच्या जनतेकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी रचलेला भाजपचा कट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या विधेयकाला जो कोणी पाठिंबा देईल, तो देशातील जनतेशी विश्वासघात करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डिलिमिटेशनला पाठिंबा देणारे 21 व्या शतकातील सगळ्यात मोठे गद्दार म्हणून ओळखले जातील. म्हणून प्रत्येक देशप्रेमी, लोकशाहीवादी पक्षाने सभागृहात डिलिमिटेशनला ठोकरून काढले पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
आपल्या पोस्टच्या शेवटी संजय राऊत यांनी, ‘इतिहास गद्दारांची नावे सदैव लक्षात ठेवतो, गद्दारीबाबत केलेले खुलासे हवेत विरून जातात,’ असे म्हणत डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देणाऱ्यांना सूचक इशाराही दिला आहे.
Comments are closed.