‘शेतकरी सन्मान’चे 25 हजारांवर लाभार्थी मयत; वारस नोंदीनंतरच लाभ, सांगलीतील 10 हजार लाभार्थी आधार लिंकविना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> प्रकाश कांबळे

केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ योजनेचा लाभ घेणाऱया सांगलीतील 25 हजार 680 शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱयांची जमीन वारसाहक्काने नावावर झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. अद्यापि जिल्ह्यातील आठ हजार 329 शेतकऱयांनी आधार लिंक केलेले नाही, तर दोन हजार 252 लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 35 हजारांवर लाभार्थी ‘शेतकरी सन्मान’ योजनेपासून वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 2019च्या अर्थसंकल्पात ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेला 4 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यता दिली. प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱयाच्या बँक खात्यावर जमा करण्याची ही योजना आहे. सरसकट शेतकऱयांना योजना लागू करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात चार लाख 15 हजार शेतकरी पात्र आहेत. ‘सन्मान’ योजनेचा 22वा हप्ता जिल्ह्यातील तीन लाख 80 हजार 197 शेतकऱयांच्या खात्यावर 76 कोटी तीन लाख 94 हजार रुपये जमा झाले आहेत. या रकमेचा जिल्ह्यातील शेतकऱयांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे. महाराष्ट्र सरकार शेतकरी योजना आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱयांना आर्थिक मदत करीत आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजारांची आर्थिक मदत दिली जाते.

‘शेतकरी सन्मान’ योजनेचा लाभ घेणाऱया जिल्ह्यातील 25 हजार 680 शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे. या शेतकऱयांची जमीन वारसाहक्काने नावावर झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज केल्यानंतर त्यांना किसान योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले. आधार लिंक आणि ई-केवायसी अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील 10 हजारांवर शेतकऱयांना हप्ता मिळालेला नाही. आठ हजार 329 शेतकऱयांनी आधार लिंक केले नसल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय दोन हजार 252 शेतकऱयांनी ‘ई-केवायसी’ केली नसल्यामुळे 22 आणि 23वा हप्ता मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले.

आधार लिंकिंग, ई-केवायसी पूर्ण करा – विवेक कुंभार

n ‘किसान सन्मान’ योजनेचा लाभ कायम मिळत राहण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी आधार लिंक आणि ई-केवायसी करण्याबाबतचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही शेतकऱयांकडून दुर्लक्ष होत आहे. शेतकऱयांनी आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि वारसाहक्काने जमीन नावावर झालेल्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज भरून किसान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

Comments are closed.