उन्हाचा पारा उकळला; बोअरवेलच्या टाकीचा स्फोट, उल्हासनगरच्या दहा चाळ येथील घटना
उन्हाचा पारा अक्षरशः उकळला असून अंगाची लाहीलाही होत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चालल्याने त्याचा फटका आता पाणीपुरवठ्यालाही बसू लागला आहे. अतिउष्णतेमुळे उल्हासनगरच्या दहा चाळ येथे बोअरवेलच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी घडली. त्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र टाकीचे दोन तुकडे झाले असून दहा चाळ भागातील रहिवाशांसमोर पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
दहा चाळ नालंदा शाळेजवळ नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल बसवली आहे. त्याच्याच बाजूला असलेल्या लोखंडी स्टॅण्डवर सिंटेक्सची टाकीदेखील ठेवण्यात आली. बोअरवेलचे पाणी या टाकीत जमा व्हायचे व ते पाणी रहिवासी वापरत होते. सध्या प्रचंड उष्णतेमुळे सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच कडक उन्हामुळे पाण्याने भरलेली सिंटेक्सची टाकी एवढी गरम झाली की तिचा स्फोट होऊन सर्वत्र तुकडे पसरले.
नवी टाकी बसवण्याची मागणी
स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रशांत चंदनशिव यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हरेश मिरकुटे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. येत्या चार दिवसात नवीन टाकी बसवण्यात येईल असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
Comments are closed.