सुनेकडे वाकड्या नजरेने पाहिल्याचा जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय अटकेत

सांगली : सुनेचा विनयभंग केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या 70 वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्याच्या (Sangli) वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे परप्रांतीय शेतमजूराने काठीने बेदम मारहाण करुन हा खून केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. या संतापजनक घटनेमुळे गोटखिंडी परिसरात खळबळ उडाली असून आष्टा पोलिसांनी (Police) संशयित परप्रांतीय शेतमजूर राजू याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे.

आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटखिंडी येथील गाताडे मळा परिसरात पांडुरंग गोविंद कोकाटे (वय 70) यांचा जनावरांचा गोठा आहे. कोकाटे यांची सून गोठ्यात शेण काढत असताना शेजारच्या शेतात काम करणारा परप्रांतीय शेतमजूर राजू तिच्याकडे गेला. त्याने तिचा हात धरून, “तू उसात चल,” असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना सुनेने पांडुरंग कोकाटे यांना सांगितल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यावेळी संशयित राजू याने कोकाटे यांच्यावर काठीने हात, पाय, डोके व शरीरावर बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या छातीवर बसूनही मारहाण केली. शेतातील आरडाओरड ऐकून मंगल कोकाटे, कमल कोकाटे व सचिन कोकाटे घटनास्थळी धावून आले. जखमी कोकाटे यांनी कुटुंबीयांना “राजूनेच मारहाण केली,” असे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन भंडारे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर संशयित राजू डोंगराच्या दिशेने पळून जात असताना ग्रामस्थ व कोकाटे कुटुंबीयांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, आष्टा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सत्यजित आवटे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगल पांडुरंग कोकाटे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात संशयित राजूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या

Comments are closed.