राज्याचा मुख्यमंत्री नेभळट, डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला; निशिकांत दुबे दलाल; संजय राऊतांची घणा

संजय राऊत: अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा (Mira Bhayandar MNS Morcha) काढण्यात येणार आहे. मात्र, त्याआधीच पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची धरपकड केली आहे. तर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निशिकांत दुबेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

संजय राऊत म्हणाले की, या मोर्चाची परवानगी मागितले जाते. आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते. मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पहाटे तीन वाजता अटक केली जाते. हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? महाराष्ट्राला मराठी मुख्यमंत्री आहे की मोरारजी देसाई यांचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरात गेला आहे. हे एक दिवस मराठी माणसांवर मोरारजी देसाई यांच्या प्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले, त्यांचा विक्रम मोडतील, अशा प्रकारचे वर्तन देवेंद्र फडणवीस करत आहेत. हे कशाकरिता आणि कुणासाठी करत आहात? तुमच्यावरती कोणत्या दुबेचा दबाव आहे? हे तुम्ही आम्हाला सांगायला हवे, असे त्यांनी म्हटले.

डुप्लिकेट शिवसेनेवाले कुठे आहेत?

महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही का? आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती अशाच न्याय हक्कांसाठी केली. तुम्ही आम्हाला सांगता बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. मग तुम्ही काय करत आहात? तुमच्यासारख्या सत्याधार्‍यांना सत्तेवरून खुर्चीवरून खाली खेचून हुतात्मा चौकात आणले पाहिजे. ते अर्ध्या दाढीवरून हात फिरवणारे डुप्लिकेट शिवसेनेवाले कुठे आहेत? हीच अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढीसह महाराष्ट्रात फिरवेल, इतकी जनता चिडलेली आहे. निशिकांत दुबेचा किती लोकांनी निषेध केला? महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये काल त्या दुबेंनी व्यक्तव्य केलं. तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा खास माणूस आहे. एकतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणत्याही हिंदी भाषेवर हल्ला केला नाही. हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने सांगायला पाहिजे.

लाज वाटत नाही का?

काय माहित आहे त्या दुबेला? म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू. हे उद्योगपतींची दलाली करून कमिशनखोरी करण्या इतका सोपं आहे का मिस्टर दुबे? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेत बसलेला आहे आणि तुम्ही महाराष्ट्राला धडे देत आहात. या राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तोंडात बोळा घालून बसले आहेत. हे डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या गप्पा मारतात, लाज वाटत नाही का? हा महाराष्ट्र स्वावलंबी आहे. हा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो. सगळ्या प्रांताचे लोक या मुंबई महाराष्ट्रात राहतात. आम्ही कोणाला त्यांचा जात, पंथ, धर्म विचारला नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या गंगेत प्रेतं तरंगत होती. तेव्हा आमचं उद्धव ठाकरेंचं सरकार हे अख्या देशाला खाऊ-पिऊ घालत होतं, उपचार करत होते, विचारा तुमच्या लोकांना, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

राज्याचा मुख्यमंत्री नेभळट, डेप्युटी सीएम अर्धा दाढीवाला

संजय राऊत पुढे म्हणाले की, दुबेला सांगावे महाराष्ट्राच्या नादाला लागू नको. मग पटकून काय हे आम्हाला दाखवावं लागेल. हे पळकुटे आणि डरपोक लोक आहेत. अजूनही तुमचे सरकार ऑपरेशन सिंदूरमधील चार अतिरेकी शोधू शकले नाहीत. मला आश्चर्य वाटतं भारतीय जनता पक्षाच्या एकाही मंत्र्याने तरी दुबेचा निषेध केला का? आम्हाला महाराष्ट्र काय आहे ते सांगू नका. दुबे हा उद्योगपतींचा दलाल आहे. त्याला असे वाटते की, मुंबईतली त्याची दलाली कमी होईल. हा दुबे मुंबईच्या दलालीवर जगत आहे. मला देवेंद्र फडणवीस यांची कीव येते. त्यांनी यापुढे मराठी भाषेत कधीच संवाद साधू नये. तो जर खरंच मर्द मराठी असेल ना तर या दुबेचा बंदोबस्त करेल. या राज्याला इतका नेभळट मुख्यमंत्री मिळाला आहे आणि सांगतोय मी मराठी आहे. तो डेप्युटी सीएम अर्धा दाढी वाला, त्याला शिवसेनेचे नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v=mvrppalgssw

आणखी वाचा

Rohit Pawar : मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केलाय, राज ठाकरेंना आता भाजपचा चेहरा कळला असेल; रोहित पवारांचा निशाणा

आणखी वाचा

Comments are closed.