भाजपने हिंदुत्व हायजॅक केले; धर्मध्वजेवर हनुमानाचे चित्र, पण तुम्ही त्यांचे आदर्श पाळले का? संजय राऊत यांचा घणाघात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी आणि मायक्रो लेव्हलवर संघटनात्मक बांधणीसाठी भेटीगाठी सुरू असल्याचे राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी काळाराम मंदिरावर फडकावलेल्या धर्मध्वजारोहण सोहळ्यावर भाष्य करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, भाजपला असे वाटते की जगातील हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर त्यांचेच नाव आहे. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावर धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला, आम्ही त्यांचे स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकावली. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळ्याचे मंत्री आणि मंत्री नरहरी झिरवळही उपस्थित होते. पण धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का?
काळाराम मंदिराचा आपण इतिहास पाहिला तर डॉ. बाळासाहेब आंबेडकरांपासून त्या काळातील सामाजिक कार्यातील महान नेत्यांनी त्या मंदिरात संघर्ष केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेशी जोडलेला आहे. या तीन प्रमुख कुटुंबातील एक-एक व्यक्ती तिथे जर बोलावली असती तर तो ध्वज अधिक तेजस्वी झाला असता, असेही राऊत म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले. नाही तर भाजप आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? या कार्यक्रमाला बाळासाहेबांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला बोलवावे असे त्यांना का वाटले नाही? म्हणून असे म्हटले की भाजपने हिंदुत्वाचा ताबा घेतला, हायजॅक केले. जमीन ताब्यात घेतात, खंडणी गोळ्या करतात त्या पद्धतीने असे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केले जातात. काळाराम मंदिराचे महत्त्व समजून न घेता हे असे कार्यक्रम झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज; माजी राष्ट्रपती कोविंद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूजन
ते पुढे म्हणाले की, अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते धर्मध्वज फडकावला. त्या धर्मध्वजेवर बहरलेल्या वृक्षाचे छायाचित्र आहे. पण देशात काय चित्र आहे. छत्तीसगड, झारखंडपासून ओडिशापर्यंत अदानीसाठी जंगलतोड सुरू आहे. ज्या जंगलातील खाणी अदानीला दिलेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. मुंबईत एका रात्रीत तीन हजार वृक्ष आरे जंगलात तोडली. तुम्ही धर्मध्वजा फडकावता, त्याच्यावर चित्र, प्रतिका टाकता, पण त्यानुसार वागायचे कुणी? नाशिकमध्ये धर्मध्वजेवर हनुमानाचे चित्र टाकले आहे, पण हनुमानाचे आदर्श काय होते ते तुम्ही पाळले का? हनुमान निष्ठावान होता, तुम्ही सगळे गद्दार तुमच्या पक्षात घेतले. तुमच्या पक्षात कोण लोक आहेत, हनुमान आहेत का? सगळे आमचे हनुमान तुम्ही घेतले. त्यामुळे भाजपने हे ढोंग बंद केले पाहिजे. हे राजकीय खेळ करून हिंदुत्वाला बदनाम करू नका, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
Comments are closed.