Yavatmal news – खाकी वर्दीतील माणुसकी! पांढरकवडा पोलिसांकडून ‘त्या’ बेवारस मृतदेहावर शास्त्रोक्त अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून काम करणाऱ्या पोलीस दलाचा एक अत्यंत संवेदनशील चेहरा यवतमाळच्या पांढरकवडा येथे पाहायला मिळाला. ज्या मृतदेहावर दावा सांगायला कोणीही नातेवाईक पुढे आले नाहीत त्या अनोळखी व्यक्तीचे ‘नाते’ जपत पांढरकवडा पोलिसांनी पूर्ण धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार पार पाडले.

काही दिवसांपूर्वी धारणा शेतशिवार परिसरामध्ये एका अंदाजे ४० ते ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर आणि पोलीस शिपाई राजू गेडाम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. कायदेशीर प्रक्रियेनुसार, मृतदेहाची ओळख पटावी या उद्देशाने तो पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आला होता. पोलिसांनी परिसरात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तीन दिवस उलटूनही कुणीही वारसदार समोर आला नाही.

मृतदेह अधिक काळ ठेवणे शक्य नसल्याने पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहू तावरे यांनी माणुसकीच्या भावनेतून पुढाकार घेतला. “ज्यांना कोणी नाही, त्यांचे आम्ही आहोत” ही भावना मनात ठेवून या अनोळखी पार्थिवावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पोलीस पथकाने केवळ औपचारिकता न पाळता, पूर्ण धार्मिक विधी पार पाडत या व्यक्तीला अखेरचा निरोप दिला. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार, पोलीस शिपाई प्रशांत गीते तसेच रुग्णसेवक राजा कुरेशी, सुनील सल्लेवार आणि राजा शेख यांची उपस्थिती होती.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

कठोर शिस्त आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ मानल्या जाणाऱ्या खाकी वर्दीतील ही संवेदनशीलता पाहून पांढरकवडा परिसरात पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांनी दिलेल्या या माणुसकीच्या दर्शनामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.