शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी हा कार्यक्रम आम्ही तडीस नेऊ – संजय राऊत
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा 18 जुलैला नागपूर येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी रामरक्षा कार्यक्रमात अडथळे आणण्याचे शासकिय प्रयत्न सुरू झाले असल्याचा आरोप केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे येत असून त्याची तयारी तर होणारच. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये खूप काळानंतर एक मोठा कार्यक्रम घेत आहोत. मात्र या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे शासकिय प्रयत्न सुरू झाले आहेत. होर्डिंग, बॅनर लावू द्यायचे नाहीत. परवानग्यांचाही विषय आहे. जे काही गोष्टी करणे शक्य आहे ते जरी होत असले तरी रामरक्षा आंदोलनाचा, हिंदुत्वाचा कार्यक्रम आम्ही तडीस नेऊ, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, हा एक राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आहे. शिवसेना ही महाराष्ट्राच्या हिंदुत्वाची जनक आहे. आजही मातोश्री ही हिंदुत्वाची राजधानी, मुख्य केंद्र आहे. जर कुणाला वाटत असेल आम्हीही हिंदुत्ववादी आहोत, तर राम मंदिराच्या लुटी विरोधात शिवसेनेने जी मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. यात काही राजकीय पक्षांचा प्रश्न नाही. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमंत्रण दिलेले आहे.
प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत. ते आमच्या एकट्याचे किंवा भाजपचे नाहीत. ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाच्या नावावर हजारो कोटी रुपये लुटले गेले, ही आमच्या सगळ्यांसाठी चिंतेची आणि शरमेची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याबाबत फार उत्तम शब्द वापरला आहे. आरएसएसने या चोरीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोक हा शब्द वापरला. खरोखरच हा शोक व्यक्त करण्यासारखाच प्रसंग आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी शिवसेना एकच असून आम्ही अमित शहांच्या गटाबरोबर कशाला जायचे? असे म्हटले. अजित पवार गट आणि शिंदे गट हे दोन्ही अमित शहांचे गट आहेत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांना वारंवार जाऊन आदेश घ्यावा लागतो. परवा सुद्धा शिंदे त्यांच्या गटाचे लोक, चोरीचा माल घेऊन अमित शहांकडे गेले. गरज काय? तुम्ही शिवसेना आहात म्हणता ना, निवडणूक आयोगाने तुम्ही शिवसेना आहात असे म्हटले ना. मग वारंवार अमित शहांच्या दारात जाऊन लाचारासारखे उभे राहण्याची गरज काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
Comments are closed.