20 जुलै हा हिंदुस्थानच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जाईल, संजय राऊत यांची सरकारवर खरमरीत टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्लीत सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीने संसदेवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात देशभरातून हजारो तरुण सहभागी झाले होते. या आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक तरुण अक्षरश: रक्तबंबाळ होईपर्यंत जखमी झाले आहेत. कुणाची डोकी फोडली, कुणाला फरफटत नेलं, तरुण संसदेपर्यंत पोहचू नये म्हणून बॅरिकेड्सला करंट देखील लावण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. सोमवारी दिवसभर संसद परिसरात आंदोलकांवर झालेल्या अमानुष मारहाणीवरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

”दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याकडे लक्ष देण्याऐवजी, सरकारने दडपशाही आणि कारवाईचा बडगा उगारला आहे. या भ्याड हल्ल्यातून त्यांची सत्याबाबत असलेली भीती उघड झाली आहे. 20 जुलै हा दिवस हिंदुस्थानच्या लोकशाहीच्या इतिहासात ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जाईल”, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच 20 जुलै हा दिवस भ्याड दिन म्हणून घोषीत करण्याची मागणी देखील त्यांनी ट्विटरवरून केली आहे.
”आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो की, २० जुलै हा दिवस ‘भ्याड दिन’ (Coward’s Day) म्हणून घोषित करण्यात यावा. जेणेकरून या राजवटीची कमजोरी आणि हुकूमशाही देशाच्या कायमस्वरूपी लक्षात राहील”, असेही त्यांनी ट्विट केले आहे.

Comments are closed.