जयकुमार गोरे हे मोठे आणि दिग्गज मंत्री… त्यांच्याबाबत बोलताना भीती वाटते : शंभूराज देसाई
सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर सत्ता नेमकी कोणाची येणार यावरून सस्पेन्स कायम आहे. काहीही झालं तरी भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर खोचक टीका करत ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री ते आहेत.त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही बोलत नाही कारण लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो, असं म्हटलं आहे.
शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता असा प्रश्न विचारल्यावर मला तो अधिकार नाही मात्र जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत, अशी खोचक टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे.
चमत्कार करायचा नाही पण चमत्कार करावा लागल्यास करु: जयकुमार गोरे
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे सर्वात जास्त 27 सदस्य निवडून आले असून एक अपक्ष आमच्या सोबत आलेला आहे, अशा परिस्थितीत सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असं जयकुमार गोरे यांनी आज म्हटलं.
दरम्यान, साताऱ्यात भाजपाला बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शंभराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एकनाथ शिंदे यांची नंदनवदन या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे.
सातारा जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी 27 जागा जिंकल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. सातारा जिल्हा परिषदेतील बहुमताचा आकडा पार करण्या इतकं संख्याबळ दोन्ही पक्षांकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 आणि शिवसेनेनं 16 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमदेवार देखील विजयी झाला आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संख्या बळ 37 पर्यंत पोहोचतं आहे.
सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : २०
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01
आणखी वाचा
Comments are closed.