मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, अर्ज मागे
हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Election) महायुती आणि महाविकास आघाडीत कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना पक्षात तर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजपमधील (BJP) फोडाफोडीच्या राजकारणाचा वाद चांगलाच रंगला असून थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत महायुती, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारी केल्याची माहिती आहे. एकीकडे भाजपकडून शिवसेना (Shivsena) उमेदवारांना पळवलं जात असल्याच्या तक्रारी असतानाच हिंगोलीत (Hingoli) शिवसेनेनंच भाजपचा अधिकृत उमेदवार पळवल्याचं पाहायला मिळालं.
राज्यात एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असताना हिंगोली नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे नगरसेवकपदाचे अधिकृत असलेल्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावत शिवसेनेत प्रवेश दिला. हिंगोली नगरपालिकेमधील प्रभाग 16 ब मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी उमेदवारी मागे घ्यायला एक दिवस शिल्लक असताना आज निवडणुकीतून स्वतःची माघार घेतली. संतोष बांगर यांच्याहस्ते त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असून भास्कर बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे, नगरपालिका निवडणुकीतील फोडाफोडीच्या या राजकारणात भाजपला हा स्थानिक राजकारणातील मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावरुन शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये यापुढे कोणीही एकमेकांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व उमेदवार घ्यायचे नाहीत, असे ठरल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र, दुसऱ्याच दिवशी हिंगोलीत शिवसेनेनं भाजप उमेदवार पळवला.
वाशिममध्ये ठाकरेच्या उपजिल्हाप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा
वाशिम जिल्हातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. कारण, त्यांच्यासाठी आलेला नगराध्यक्षपदाचा एबी फॉर्म जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी पत्नीच्या अर्जाला जोडल्याचा धक्कादायक आरोप ठेंगडे यांनी केला आहे. तसेच, आपण बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेखा मापारी यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. तसेच, नागोराव ठेंगडे यांचं त्यांना आव्हानही असणार आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
आणखी वाचा
Comments are closed.