शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार कोण?

मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वर्धापन दिन दोनच दिवसांवर आला असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सहा खासदारांपैकी तीन खासदार आधी दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यानंतर एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. या सहा खासदारांमधील पाच खासदार हे उद्धव ठाकरेंच्या 14 जून रोजीच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले होते. मात्र सहावा खासदार नेमका कोण याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत या सहाव्या खासदाराचं नाव हे लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रातून उघड होण्याची शक्यता आहे.

ठाकरेंचे तीन खासदार दिल्लीत पोहोचल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा बळ मिळालं आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे तिघे चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत.

संजय दीना पाटील दिल्लीमध्ये दाखल

खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली. तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आधी नॉट रिचेबल होते. त्यानंतर हैदराबाद विमानतळावरून ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी संजय दीना पाटील हेदेखील दिल्लीला गेल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणारे सहावे खासदार हे संजय दीना पाटील हे असू शकतात असा तर्क लावला जात आहे.

सहा खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र देणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांची बुधवारी सकाळी भेट घेणार आहेत. त्यानंतर सहा खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती आहे. एकूण नऊ खासदारांपैकी जर सहा खासदार फुटले तर वेगळा गट निर्माण होऊ शकतो आणि ते खासदार कायदेशीर अडचणीत येणार नाहीत.

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे

1. अनिल देसाई

2. अरविंद सावंत

3. संजय दिना पाटील

4. राजाभाऊ वाजे

5. संजय जाधव

6. संजय देशमुख

7. नागेश पाटील आष्टीकर

8. ओमराजे निंबाळकर

9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

शिंदेना पाठिंबा देणाऱ्या सहाव्या खासदाराचे नेमकं नाव समोर आलं नाही.

ठाकरेंचे तीन शिलेदारही दिल्लीत, कायदेशीर सल्ला घेणार

दरम्यान, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदार यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीत गेल्याची माहिती आहे. खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झाले असून ते या सर्व घडामोडींवर कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.