संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प’वार’

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून ठाकरेंच्या बाजुने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बॅटींग करत आहेत. या फुटीनंतर संजय राऊत एकनाथ शिंदेंवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात. त्यातच, राजधानी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आला. महाविकास आघाडीचे जनक म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. मात्र, त्यांच्याचहस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळेच, संजय राऊतांनी या सत्कार सोहळ्यावर टीका करताना शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवारांनी (Sharad pawar) या सत्कार सोहळ्याला जायला नको होतं, असंच राऊत यांनी म्हटलं. आता, राऊत यांच्या टीकेवर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देताना, तू असंच जळत राहा म्हटले. तर, आता खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे आले आहे.

एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमात निलेश लंकेंना प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत हे सध्या शरद पवारांबद्दल अत्यंत आदराने बोलतात. पण, एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेमुळे प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत हे स्वत: बोलत आहेत की, त्यांच्या तोंडून दुसरं कोणी हे वदवून घेत आहेत? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी जेव्हा ही न्यूज पाहिली तेव्हा 6 जनपथ या पवारसाहेबांच्या निवासस्थानीच होतो. तेव्हा ही न्यूज पाहून आम्हीही शॉकेबल झालो. संजय राऊत यांच्याकडून असं वक्तव्य कसं गेलं, असा प्रश्न आम्हालाही पडल्याचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलं. तसेच, संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शरद पवारांनीही पहिली रिएक्शन काय दिली हेही लंकेंनी सांगितलं.

सत्कार सोहळ्यावर संजय राऊतांची टीका पाहून पवारसाहेब मिश्कीलपणे हसले. आम्ही 6 जनपथला होतो, पवारसाहेबांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही, पण ते मिश्कील हसले, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मीतहास्य होतं, अशी माहिती निलेश लंके यांनी दिली. त्यामुळे, राऊतांच्या टीकेवर शरद पवारांनी हसून पहिली प्रतिक्रिया खासदार लंकेंच्या माध्यमातून दिल्याचं समोर आलं आहे.

एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले शरद पवार

ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, हे याठिकाणी सांगायला हरकत नाही, असे म्हणत शरद पवारांनी सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेचं कौतुक केलं. तसेच, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबईमुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या ५० वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही

अधिक पाहा..

Comments are closed.