श्रेयस अय्यरला 'या' खेळाडूकडून घ्यायच्या कॅप्टन्सी टिप्स; धोनी, रोहित-विराट नाहीतर भलताच

आयपीएलमधील पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आपल्या नेतृत्वाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले होते, त्यानंतर त्याला करारमुक्त करण्यात आले. २०२५ मध्ये त्याने पंजाबच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली आणि पुन्हा एकदा उत्तम नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. सध्याच्या हंगामातही त्याची ही कामगिरी यशस्वीपणे सुरू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने आतापर्यंत पाच सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही. यामुळे या हंगामात पंजाब हा एकमेव अपराजित संघ आहे.

श्रेयसने नुकतेच स्टारस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याला कोणत्या कर्णधाराकडून मार्गदर्शन घ्याला आवडेल, याचे उत्तर दिले आहे. यावेळी त्याने जे नाव घेतले ते जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्याला एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून नाहीतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधाराकडून सल्ले घ्यायचे आहेत.

श्रेयसला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याच्याकडून कर्णधारपदाचे मार्गदर्शन घ्यायचे आहे.

पंजाबने गुरुवारी (१६ एप्रिल) मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस यांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ६ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या होत्या. पंजाबकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने प्रभावी कामगिरी केली. त्याने ४ षटकात २२ धावा देत रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव आणि शेर्फेन रदरफोर्ड यांच्या विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरनने ३९ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ८० धावा केल्या. श्रेयसने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार मारत ६६ धावा केल्या. पंजाबने लक्ष्य १६.३ षटकात ७ विकेट्स शिल्लक राखत गाठले. यामध्ये मुंबईच्या एका गोलंदाजाला वगळता बाकींनी निराशाजनक कामगिरी केली. अल्लाह गजफरने ४ षटकात ३१ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

Comments are closed.