Solapur News – शालेय गणवेश गारमेंट केंद्राला भीषण आग, ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण
शहरातील साखरपेठ परिसरातील स्वस्तिक मिठाई समोरील गल्लीत आज सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शालेय गणवेश तयार करणाऱ्या जुन्या दुमजली गारमेंट केंद्राला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात कापड व तयार गणवेश जळून नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफन सगरी यांच्या मालकीच्या रेडीमेड शालेय गणवेशाच्या केंद्रात अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी धूर व ज्वाळा दिसताच तात्काळ अग्निशमन विभागाला कळवले. रविवार पेठ येथील मुख्य अग्निशमन केंद्र जवळ असल्यामुळे अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, गल्लीत अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना थेट आगीच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. त्यामुळे सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर गाड्या उभ्या करून अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाईपच्या साहाय्याने आतमध्ये प्रवेश करून पाण्याचा मारा करावा लागला. गारमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड साठा असल्याने आगीने काही वेळातच तीव्र रूप धारण केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतःही बचाव व आग विझवण्याच्या कामात सहभागी झाले. घटनास्थळी पोलिस दाखल होत बघ्यांची झालेली गर्दी वर नियंत्रण मिळवले. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
आगीची तीव्रता पाहता अग्निशमन विभागाचे रेस्क्यू व्हॅन, ऑक्सिजन मास्क व ऑक्सिजन टाक्यांसह ‘अग्नीदूत’ पथकही घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या सुमारे सहा बंबांच्या मदतीने जवळपास ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
Comments are closed.