भारतीय क्रूसह जहाजांवर हल्ले सुरूच आहेत.

होर्मुझमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय ठार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, तेहरान

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता भारतीय खलाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. गुरुवारी ओमानच्या शिनास बंदराजवळ एमटी जलवीर या आणखी एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. या जहाजावर वीस भारतीय खलाशी आहेत. होर्मुझजवळील या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या एमटी जलवीर या जहाजावर गुरुवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ हल्ला झाला. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली. या घटनेनंतर भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी, बुधवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एमटी सेट्टेबेलो या तेलवाहू जहाजावर झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यात तीन भारतीय ठार झाल्याची पुष्टी झाली आहे.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आतापर्यंत दोन मृतदेह सापडल्याची माहिती गुरुवारी दिली. एमटी सेट्टेबेलो हे जहाज इराणचे तेल घेऊन जात असताना त्यांनी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे अमेरिकन लष्कराने म्हटले होते. त्यानंतर आता भारतीय कर्मचारी असलेल्या एमटी जलवीर या जहाजावर हल्ला झाला आहे. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. मुख्यत्त्वेकरून भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर हल्ला सुरू असल्याचे यातून दिसून आले आहे. यापूर्वी सोमवारी, अमेरिकेने द मारिह्यू या तेलवाहू जहाजावरही हल्ला केला होता. त्या जहाजावरही 24 भारतीय खलाशी होते. त्या सर्वांना ओमानच्या लष्कराने सुखरूप वाचवले होते.

एमटी जलवीरला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, एमटी जलवीरवरील हल्ल्यामुळे जहाजाच्या चिमणी आणि इंजिन रूममध्ये भीषण आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामध्ये जहाजातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे जहाजावरील सर्व 20 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याची पुष्टी केली असून ते स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाकडून हल्ल्यांचा तीव्र निषेध

ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा भारत सरकारने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत या प्रदेशात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून तेथील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा हा थेट परिणाम असल्याचे म्हटले आहे. या भागातील तणाव तात्काळ कमी करावा आणि या प्रदेशात शांतता व स्थैर्य पुनर्संचयित करण्यासाठी राजनैतिक तोडगा काढावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियामध्ये भारतीय खलाशांशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. आम्ही आमच्या खलाशी समुदायाच्या कल्याणाला आणि सुरक्षेला खूप महत्त्व देतो, असेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.