कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे. आतापर्यंत जे काही घडलं ते समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, अशा शब्दात सुनेत्रा पवारांनी इशारा दिला. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, काम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी त्याला न्याय आणि संधी मिळणार याची खात्री देते, असं आश्वासनही सुनेत्रा पवारांनी दिलं.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अजितदादा ज्या प्रमाणे कठोर निर्णय घ्यायचे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील असं त्या म्हणाल्या.

NCP Foundation Day Sunetra Pawar Speech : कठोर निर्णय घेणार

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेताना मला सगळ्याची जाणीव होती. मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं, प्रत्येकवेळी मी सर्वांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत कार्यकर्त्यांना समजून घेतलं, त्यांचा हट्ट पुरवला. त्यांना मान सन्मान दिला, पदं दिली. जे काही मागितलं ते देण्याचा प्रयत्न केला. यापुढे पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर नक्कीच विचार केला जाईल.”

दादा ज्या प्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत, तसेच निर्णय घेतले जातील. ते माझ्या स्वभावाला जड जाईल, पण दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मला खात्री आहे, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे पक्षहिताच्या निर्णयामध्ये माझी साथ देतील, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. पक्षाची होणारी बदनामी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे. मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी, असंही त्या म्हणाल्या.

NCP Foundation Day :  कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, काम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी त्याला न्याय आणि संधी मिळणार याची खात्री देते. लवकरच विविध महामंडळांच्या नियुक्त्या केल्या जातील. पक्ष निष्ठा आणि समर्पण या निकषावर हे निर्णय घेतले जातील. पक्षासाठी किती वर्षे काम केलं यापेक्षा पक्षाला किती पुढे नेलं जाईल याचा विचार केला जाईल. बाहेरून आलेल्या नेत्यांचा सन्मान राखण्यासाठी काही तडजोडी केल्या जातील, पण कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही.”

ही बातमी वाचा:

Comments are closed.