कोलकाता जिंकले रे…सुपर ओव्हरमध्ये सुपर्ब विजय; रिंकूची अष्टपैलू कामगिरी
कोलकाताचा डाव 155 धावांत रोखल्यावर लखनौ सहज जिंकणार असे वाटत होते, मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत लखनौचा पराभव निश्चित केला होता. मात्र अखेरच्या क्षणी सामन्याने नाटयमय कलाटणी घेतली. शेवटच्या षटकात 17 धावांची गरज असताना कार्तिक त्यागीने टाकलेले 2 नोबॉल, मग हिम्मत सिंगने ठोकलेला चौकार, पुढच्या चेंडूवर हिम्मतची पडलेली विकेट आणि शेवटच्या चेंडूवर विजयाची 7 धावांची गरज असताना मोहम्मद शमीने खेचलेला षटकार, अशा रंगतदार षटकात लखनौने गमावलेला सामना बरोबरीत सोडवला. मात्र सुपर ओव्हरमध्ये लखनौच्या फलंदाजांनी 3 चेंडूंतच हाराकिरी पत्करल्यामुळे कोलकात्याला विजयासाठी केवळ 2 धावांची गरज होती आणि रिंपू सिंगने पहिल्याच चेंडूंवर चौकार खेचत आपल्या विजयावर शिक्का मारला. या विजयामुळे कोलकाताने दुसऱ्या विजयाची नोंद केली तर लखनौला सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. सलग पाचव्या पराभवामुळे लखनौ तालिकेत रसातळाला पोहोचला आहे.
दोन्ही तळाच्या संघांमध्ये झालेला हा सामना टी-20 क्रिकेटला साजेसा झालाच नाही. 31 धावांत 4 विकेट गमावणाऱ्या कोलकात्याला एकटया रिंपू सिंगने सावरले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या रिंपूने 51 चेंडूंत केलेल्या 83 धावांच्या नाबाद खेळीने कोलकात्याला 155 धावांपर्यंत नेले. आज मोहसीन खानने 23 धावांत 5 विकेट घेत कोलकात्याला रोखण्यात यश मिळवले.
त्यानंतर 156 धावांचा पाठलाग करताना लखनौचीही वाईट अवस्था झाली. त्यांच्याही डावाला पुणी वाली नव्हता. ऋषभ पंतने 38 चेंडूंत 42 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मधल्या फळीत आयुष बदोनी आणि हिम्मत सिंगने वेगात धावा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामन्यात रंगत आली. अखरेच्या षटकांत झालेल्या नाटयमय घडामोडींमुळे कोलकात्याने जिंकलेला सामना लखनौने बरोबरीत सोडवला. पण शमीचे प्रयत्न सुपर ओव्हरमध्ये अपयशी ठरले. सुनील नरीनने सुपर ओव्हरच्या पहिल्या तीन चेंडूतच निकोलस पूरन आणि एडन मारक्रम यांचे विकेट काढत लखनौचा गेम ओव्हर केला.
Comments are closed.