अजित पवारांसोबत हसत-खेळत गप्पा; शरद पवारांनंतर एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेही स्पष्टच बोलल्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त आमदार निवडून आणता आले नाहीत. त्यातच गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी विविध बैठका किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढल्या आहेत. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस (एनसीपी) एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी दोन पक्ष एक व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील एकत्र येण्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असे शरद पवारांनी स्पष्ट केले. आता, सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. मला आधी साहेबांना भेटावे लागेल, जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल. साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी स्पष्ट केले.

खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो असे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. आमचे 8 ही खासदार उत्तम परफॉर्म करणारे आहेत. 8 खासदार एकत्रित आहेत, जो निर्णय घेतला जाईल तो एकत्रित घेतला जाईल. मला आधी साहेबांना भेटावे लागेल, जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल. साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. पण सध्या देश पहिला आहे, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले.

काय म्हणाले शरद पवार

शरद पवार म्हणाले की, भविष्यात एकत्र यायचं की नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावं. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. जरी आमची माणसं वेगवेगळ्या पक्षांत विभागली गेली असली, तरी विचारधारा मात्र एकच आहे. दिल्लीतील आमचे खासदार एकाच विचाराने जोडलेले आहेत. राज्यातील काही आमदारांना वाटतं की मतदारसंघातील विकासकामं मार्गी लावण्यासाठी अजित पवारांसोबत जाणं गरजेचं आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय मी देणार नाही. हा निर्णय त्यांनाच एकत्र बसून घ्यावा लागेल. एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी चर्चेने निर्णय घ्यावा. पक्ष उभारणीच्या काळात जे लोक माझ्यासोबत होते, तेच आज वेगवेगळ्या बाजूंना गेले आहेत, पण त्यांची विचारधारा अजूनही एकसारखी आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व एकत्र आले, तर मला त्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे मनोमिलन?

साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त खूप दिवसांनी पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार हे आज साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते.अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये खूप दिवसानंतर हास्यविनोद पाहायला मिळाला. त्यामुळे या दोघांचे मनोमिलन झाल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच या बहिण भावंडांमध्ये मनमोकळा हास्यविनोद, आपुलकीने एकमेकांची विचारपूस झाल्याने या दोघांचे पॅचअप झाल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा

भारतासोबत फक्त इस्रायल, पाकिस्तानसोबत चीन, तुर्कस्तान अन् अजबैजान; संरक्षणमंत्र्यांची संसदेत मुक्ताफळं

अधिक पाहा..

Comments are closed.