‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय’; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टो

सुप्रिया सुळे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पक्षांतराच्या सातत्याने रंगणाऱ्या चर्चांवर मिश्कील शैलीत भाष्य करत नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षांतराच्या चर्चांवर उपरोधिक टिप्पणी केली.

उद्धव ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3 च्या पूर्ण तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यावेळी ठाकरेंसोबतच शरद पवारांचे आमदार आणि खासदारही एकनाथ शिंदे यांच्या टार्गेटवर असल्याचं कळतंय. या आमदार, खासदारांसह सातत्यानं गुप्त बैठका आणि भेटीगाठी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. आता या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी भर कार्यक्रमात मिश्कील टिपण्णी केलीय.

सुप्रिया सुळे: ‘आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमचा 8 खासदारांचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवले जात आहे. आम्ही त्या ग्रुपवर गमतीने बोलतो की, आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचे बाकी राहिले आहे. आम्हाला कमोडिटी करून ठेवले आहे. याने अस्वस्थ आहोत, दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आता इंटरनॅशनल करून टाका. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार. आम्हाला आता जोक केले जात आहे हे दुर्दैव आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्येही हशा पिकला, तर राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाची चर्चा आता सुरू झाली आहे.

Operation Tiger: पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या रडारवर

दरम्यान, एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर-3’ (Operation Tiger 3) ची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता या नव्या मोहिमेत ठाकरे गटासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारही शिंदे गटाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संबंधित लोकप्रतिनिधींसोबत सातत्याने गुप्त बैठका आणि संपर्क सुरू आहेत.

शिंदे गटातील सूत्रांचा दावा आहे की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 10 आमदारांचे शिंदे गटात येण्यासाठी मतपरिवर्तन करण्यात आले आहे. मात्र, पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणखी 5 आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय, ठाकरे गटातील आणखी एका खासदाराशी (MP) संपर्क साधण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. ‘ऑपरेशन टायगर-3’ ची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय निलेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Uddhav Thackeray Operation Tiger: 5 कोटींचं आमिष, ‘ऑपरेशन टायगर’च्या वावड्या उठताच उद्धव ठाकरेंची मोठी ॲक्शन, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला पाठवलं; नेमकं काय घडतंय?

Comments are closed.