रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणवरही बोलल्या
पुणे : दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या विमान दुर्घटनेवरुन सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांची विमान दुर्घटना हा घात की अपघात? असा सवाल उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्याच, अनुंषगाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी देखील बारामती विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यातच, रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भाने खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का, यावरही त्यांनी उत्तर दिले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दिवशी बारामतीत दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असतानाही वैमानिक कॅप्टन सुमित कपूरने विमान माघारी न फिरवता खाली उतरवले. त्याने विमानाचा स्फोट करण्यासाठी विमान मुद्दाम खाली आदळले, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी आज केला. तसेच, विमान अपघाताबाबत अनेक नव्या शंका उपस्थित करत विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही त्यांनी केले. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता, प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
एकतर रोहितची अस्वस्थता साहजिक आहे, सगळ्यांना उत्तर हवं आहे, रोहित उत्तर शोधत आहे. विमान दुर्घटनेची इन्क्वायरी पारदर्शकपणे झाली पाहिजे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, ब्लॅक बॉक्समधील माहिती टेक्निकली मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
शरद पवार राज्यसभेवर जाणार का?
सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य करताना, माझा भाऊ मोकळ्या मानाचा होता, माझा दादा गेला ते दुःख आयुष्यभर राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. तर, शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीसंदर्भाने बोलताना पुढच्या 8 दिवसात निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार की नाहीत, याचे उत्तर 8 दिवसांत मिळणार आहे.
माझं पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालंय
भिगवणमधील मुलीच्या अपरहणासंदर्भात बोलताना, माझं पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं आहे, पीडित कुटुंबीयांस न्याय भेटला पाहिजे, तिथं शांतता राहिली पाहिजे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. तसेच, हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात नवीन ट्रॅन्ड झालाय, आमचं म्हणणं आहे हिंसा होऊ नये, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली.
हेही वाचा
पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला, रोहित पवारांचा हादरवणारा आरोप
आणखी वाचा
Comments are closed.