बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबत
पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पुणे पोलिसात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी मोठी धावाधाव करत या घटनेचा तपास केला. त्यावेळी, आमदारपुत्र ऋषीराज सावंत हे बँकॉकला चालले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, आमदार तानाजी सावंत हेही पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते. अखेर, तानाजी सावंतांनी आपलं वजन वापरुन बँकॉकला निघालेलं ऋषीराज सावंत यांचं चार्टर प्लेन चेन्नईतूनच पुण्याकडे वळवलं. विशेष म्हणजे मुलालाही या गोष्टीचा थांगपत्ता लागला नसून विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर त्याला या गोष्टीचा उलगडा झाला. आता, ऋषीराज सावंत हे बँकॉकला नेमकं कशासाठी निघाले होते, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. बिझनेस ट्रिपसाठी ऋषीराज आपल्या दोन मित्रांसमवेत बँकॉकला जात होते, अशी कबुली पोलिसासमोर देण्यात आली आहे. ऋषीराजसमवेत असलेल्या दोन्ही मित्रांचा जबाब पुणे (पुणे) पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.
बँकॉकला “बिझनेस ट्रिप”साठीच चाललो होतो, अशी माहिती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांनी पोलिसांना दिली. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत ऋषीराज सावंत यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वसेकर यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. एका खासगी विमानाने 78 लाख 50 हजार रुपये देऊन ऋषीराज सावंत हे त्यांच्या 2 मित्रांना घेऊन बँकॉकच्या दिशेने निघाले होते. ऋषीराज यांनी त्यांच्या घरी बँकॉकबद्दल सांगितले आहे का नाही याबद्दल मित्र अनभिज्ञ होते. त्यातील एक मित्र सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत आहे, अशी माहितीही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.
ऋषीकेश यांचे भाऊ गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या नाट्यमय प्रसंगाबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे. काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला हे कळत नव्हतं म्हणून वडिल तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यानंतरच, आम्ही सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दिल्याचं गिरीराज यांनी सांगितलं. तर, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सुत्रे हलली आणि सावंत यांचे चार्टर प्लेन चेन्नईतून माघारी फिरले. बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषीराज सावंत यांच्या खासगी विमानाने हवेतूनच युटर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषिराज सावंत कळालं की, आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत.
सरकार सातत्याने सत्तेचा दुरुपयोग करतंय
तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. हे सरकार सातत्याने सत्तेचा दुरुपयोग करत आहे, हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांना वरून आदेश दिले जातात, असे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, संतोष देशमुख प्रकरण असो वा परभणी प्रकरण असो. सत्ता पक्षाचे आमदार पोलिसांना माफ करा असं सांगत आहेत. पण, पोलीस आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करत आहे, असेही नानांनी म्हटले.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.