एकीकडे ठाकरेंशी इमानाच्या आणाभाका अन् दुसरीकडे चंद्रहार पाटलांच्या शिंदे गटासोबत गुप्त बैठका
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीवेळी सांगली मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा जोरदार विरोध असूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ज्या चंद्रहार पाटलांच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे राहिले होते, तेच आता पक्षाला अलविदा करणार असल्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांची भेट घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या मध्यस्थीने ही भेट घडून आली होती. या बैठकीनंतर चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच पंगतीत जेवल्याचीही माहिती समोर आली होती. तेव्हापासूनच चंद्रहार पाटील हे ठाकरेंचं शिवबंधन तोडून शिंदे गटात जातील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, चंद्रहार पाटील यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या होत्या. परंतु, आता चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
एकीकडे चंद्रहार पाटील हे आपली शिंदे गटाशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे म्हणत आहेत. परंतु, दुसरीकडे डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील गुप्तपणे शिंदे गटासोबत वाटाघाटी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली होती. या बैठकीला खासदार धैर्यशील माने हेदेखील उपस्थित होते. या तिघांमध्ये दिल्लीत चर्चा झाली. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
चंद्रहार पाटील काय म्हणाले होते?
कुडाळमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले होते. मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2005 साली पासून, म्हणजेच जवळपपास 20 वर्षांपासूनचे माझे मित्र व राज्याचे उद्योग मंत्री मा.उदय सामंत साहेब यांनी मला स्नेह भोजनाचे आमंत्रण दिले. मी भोजन करून 15 ते 20 मिनिटांत मी बाहेर पडलो. या वेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली. परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की.परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले होते.
https://www.youtube.com/watch?v=UFL2WMB-2B4
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.