Thailand Open 2026 badminton – श्रीकांतने बदला घेत सिंगापूरच्या खेळाडूला धूळ चारली

हिंदुस्थानचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने अखेर 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाचा बदला घेत सिंगापूरच्या लो केन यू याच्यावर दमदार विजय मिळवला. थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत श्रीकांतने लो केन यूचा 21-14, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव करत तब्बल आठ वर्षांनंतर त्याच्यावर विजय मिळविला. विशेष म्हणजे याच आठवडयात श्रीकांतने पुन्हा जागतिक क्रमवारीतील अव्वल 30 मध्ये प्रवेश केला आहे.

2021 मध्ये स्पेनमधील ह्युएल्वा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत लो केन यूने वेगवान आणि आक्रमक खेळाच्या जोरावर श्रीकांतला हरवत हिंदुस्थानचे दुसरे जागतिक विजेतेपद हुकवले होते. त्या पराभवानंतर श्रीकांतला त्याच्याविरुद्ध अनेकदा अपयश आले, मात्र यावेळी थायलंडमध्ये हा हिंदुस्थानी खेळाडू पूर्णपणे वरचढ ठरला.

कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये श्रीकांतने लो केन यूवर एकमेव विजय मिळवला होता. त्यानंतर जागतिक स्पर्धा, डेन्मार्क ओपन आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हा विजय श्रीकांतसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. आता पुढील फेरीत श्रीकांतचा सामना तैवानच्या सु ली यांग याच्याशी होणार आहे.

सिंधू, सेनचा विजयरंभ

दरम्यान, हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने चिनी तैपेईच्या तुंग सियू-टोंगचा 21-9, 21-12 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात सातव्या मानांकित लक्ष्य सेन याने जिया हेंग जेसन तेहवर 21-16, 21-17 असा विजय मिळवला. त्याचा पुढील सामना चीनच्या झू चून चेन याच्याशी होऊ शकतो.

आयुष, थरुन, प्रगती, मौल्यवान पराभूत

हिंदुस्थानच्या आयुष शेट्टीला जपानच्या कोदाई नाराओकाविरुद्ध 13-21, 21-17, 4-21 असा पराभव पत्करावा लागला. तसेच थरून मन्नेपल्ली यालाही जपानच्या कोकी वॅटनेबविरुद्ध 12-21, 16-21 अशी हार पत्करावी लागली. महिला एकेरीत उन्नती हुडा आणि अनमोल खरब यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. .

Comments are closed.