दिल्लीत रंगणार थॉमस-उबेर चषक
जागतिक बॅडमिंटनच्या मैदानावर हिंदुस्थानचा दबदबा वाढत असतानाच आता आयोजनाच्या आघाडीवरही देशाने मोठी झेप घेतली आहे. प्रतिष्ठsच्या थॉमस आणि उबेर चषकाच्या 2028 मधील अंतिम स्पर्धेचे यजमानपद नवी दिल्लीला मिळाले आहे. बॅडमिंटन विश्व महासंघाने (बीडब्ल्यूएफ) या निर्णयाची घोषणा करत हिंदुस्थानवर विश्वासाची मोहोर उमटवली. त्यामुळे तब्बल 14 वर्षांनंतर ही पुरुष आणि महिला सांघिक विश्व अजिंक्यपद स्पर्धा पुन्हा मायदेशात रंगणार आहे.
2014 मध्ये दिल्लीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी हिंदुस्थानी महिला संघाने उबेर चषकात ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. पुरुष संघाने 2022 मध्ये थॉमस चषकावर पहिल्यांदाच नाव कोरले, तर 2026 मध्ये कांस्यपदक पटकावले. त्यामुळे 2028 मध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा जेतेपदाचा झेंडा फडकवण्याची संधी पुरुष संघाला मिळणार आहे.
यंदाच्या घोषणेत स्पर्धेच्या स्वरूपातही मोठे बदल करण्यात आले आहेत. 2028 पासून 24 पुरुष आणि 24 महिला संघ सहभागी होतील. चार गटांत प्रत्येकी सहा संघ असतील. प्रत्येक संघ चार साखळी सामने खेळेल आणि अव्वल 12 संघ बाद फेरीत प्रवेश करतील. लढती तीन सामन्यांच्या असतील; दोन सामने जिंकणारा संघ विजयी ठरेल.
Comments are closed.