सलग दोन सामन्यांतील अपयशानंतर वैभवचा धमाका! स्वतःच सांगितलं खेळीमागचं रहस्य

भारत अ संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) 204 धावांची धडाकेबाज खेळी केली. (India A vs UAE A) मंगळवारी (24 नोव्हेंबर) 2026 रायझिंग स्टार्स एशिया कप स्पर्धेत (Asia Cup Rising Star) भारत अ आणि यूएई यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात वैभवने अनेक मोठे विक्रम मोडले. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक आणि द्विशतक झळकावले. याशिवाय सर्वात वेगवान 150 धावा करण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. सामना संपल्यानंतर वैभवने इतकी मोठी खेळी करण्यामागील आपली रणनीती सांगितली.

स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांत वैभवला मोठी खेळी करता आली नव्हती. नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 26 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान अ संघाविरुद्ध तो केवळ 11 धावा करून बाद झाला होता. सुरुवातीच्या दोन सामन्यांत तो लवकर बाद झाला होता. त्यामुळे पुढील सामन्यासाठी त्याने खास रणनीती आखली होती.

204 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, गेल्या दोन सामन्यांत मी खेळपट्टीवर स्थिरावलो होतो, मात्र मोठी धावसंख्या उभारू शकलो नाही. त्यामुळे या सामन्यात सुरुवातीला मैदानावर जाऊन थोडा वेळ घेण्याची माझी योजना होती. मात्र, एक-दोन चेंडू खेळल्यानंतर मला जाणवले की, खेळपट्टीवरून गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. त्यामुळे मी माझ्या फलंदाजीतील ताकदीवर विश्वास ठेवला.

वैभव पुढे म्हणाला, माझ्या मनात काही विशेष विचार नव्हता. खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळत असेल, तर थोडा वेळ घेऊन मोठी खेळी करायची, एवढाच विचार होता. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे तसे काही घडले नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती आणि चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. त्यामुळे मी माझ्या खेळावर विश्वास ठेवला.

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या मानसिकतेबद्दल सांगितले की, यामध्ये काही वेगळे नव्हते. माझा विचार तोच होता, सुरुवातीपासून मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला माझ्या नियंत्रणात खेळ होत नसेल, तर मी थोडा वेळ घेतला असता. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे मला लवकरच खेळावर नियंत्रण मिळवता आले. त्यानंतर मी माझ्या पद्धतीने फलंदाजी केली.

Comments are closed.