मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? मराठी रंगभूमी दालनवरुन आदित्य ठाकरेंचा सवाल
मुंबई : राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची केली असून राज्य सरकारने हिंदी साह (हिंदी) इतरही प्रादेशिक भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. सरकारच्या या निर्णयाला मनसेनं स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला असून राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यानंतर, इतर राजकीय पक्षांकडून देखील या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज्यात मराठी भाषेलाच प्राधान्य असून हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असेही सांगितले जात आहे. तर, या निर्णयामागे भाजप (भाजप) किंवा सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा छुपा अजेंडा असल्याचाही आरोप होत आहे. आता, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल, असे स्पष्ट केले. तसेच, मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? असा सवालही उपस्थित केला आहे.
आमचा कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच. त्याविरुद्ध आंदोलन सुरु असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येतंय का की मागल्या दाराने मराठीद्वेषी भाजपाचं काय चाललंय? असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला. गिरगाव चौपाटी येथे उद्धवसाहेबांनी मुंबईत सुरु केलेलं ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप रद्द करायचं, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालयं घुसवून त्याचं महत्व कमी करायचं आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करुन घोंगडं भिजवत ठेवायचं, असा सरकारचा डाव असल्याचे आदित्य यांनी म्हटलं आहे.
हे सगळं कश्यासाठी करतंय भाजपा? गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? ह्याचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का? आणि ह्यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का?, असा सवालही आदित्य यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंनी नाव न घेता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सरकारवर निशाणा साधला आहे.
हिंदी सक्तीला मनसेचा विरोध
महाराष्ट्र शासन छुप्या मार्गाने महाराष्ट्रात पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्यात आल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.त्यास सुरवातीपासून मनसेने विरोध केल्याने शासननिर्णयातील “अनिवार्य” हा शब्द काढून “सर्वसाधारण” असा शब्द घेतला आहे. हा कावा मराठी माणसानं वेळीच ओळखला पाहिजे म्हणत मनसेनं विविध शाळा व प्रशासकीय कार्यालयात जाऊन आंदोलन केले.
हेही वाचा
मॉडेलिंग हा अपघात, माझ्यासोबतचा प्रँक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 90s चं सर्वात आवडतं गाणं कोणतं?
आणखी वाचा
Comments are closed.