गॅसच्या रांगेत उभारलेल्या वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची
अकोला : राज्यात गॅसचा तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात गॅस सिलेंडर (Gas shortage) मिळवण्यासाठी रांगाच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभा राहवे लागत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यातच, अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे धक्कादायक घटना घडली असून गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात (Akola) प्रशासनाविरुद्ध संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दु:खद घटनेबाबत शोक देखील व्यक्त केला जात आहे, विशेष म्हणजे संबंधित वृद्ध हे माजी सरपंच आहेत.
गॅसच्या रांगेत उभारेलेल्या अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचे दुर्दैवी निधन झाले. यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी ते रांगेत उभे असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. शंकरराव शिरसाट यांच्या निधनामुळे अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे.
वंचितची सरकारवर टीका
दरम्यान, गॅसच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनशून्यतेवर कठोर टीका केली आहे. “गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता,” असे त्यांनी म्हटले.
मिरा भाईंदरमध्ये पोलिसांची पाहणी
मिरा-भाईंदर मध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या बातम्या व मेसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शहरातील विविध गॅस एजन्सी व गोडाऊनवर पोलीस व रेशनिंग विभागाने संयुक्त अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी आणि रेशनिंग इन्स्पेक्टर ऋतुजा बांगरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी गॅस बुकिंग प्रक्रिया, सिलेंडर पुरवठा, संभाव्य तुटवडा तसेच जादा दर आकारणीबाबत एजन्सी व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली.
भिवंडीत गॅस लायटर कंपनीला आग
भिवंडी तालुक्यातील पडघा कल्याण रस्त्यावरील सापे ग्रामपंचायत हद्दीतील वायपीएम म्युनिफॅक्युचुलर गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागण्याची घटना दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. एक मजली इमारती मधील कंपनीत मोठ्या प्रमाणावर गॅस लायटर बनविण्याचे काम सुरू असल्याने कंपनीत ज्वलनशील पदार्थ व गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणावर साठवलेला होता. पाहता पाहता आग भडकल्याने आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कंपनीची इमारत वेढली गेली. त्यामध्ये गॅस लायटरचे स्फोट होत राहिल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण होत होत्या. घटनास्थळी भिवंडी व कल्याण अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल होत त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु, कंपनीच्या पहिल्या मजल्यावर स्थानिकांनी सुमारे ३५ बकरे बांधून ठेवले असल्याने या आगीत हे सर्व बकरे मृत्युमुखी पडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, परंतु अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी या बाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
हेही वाचा
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
आणखी वाचा
Comments are closed.