तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, केंद्रही सील

सोलापूर : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरूच असून भेसळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याच तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ‘इफेक्ट’ (Tukaram Mundhe Effect) आता सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. सांगोला तालुक्यातील जवळा येथील एका दूध संकलन केंद्रावर एफडीएने छापा टाकून तब्बल 37 हजार 532 लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केलं. या दुधाची किंमत जवळपास 15 लाख इतकी आहे.

एफडीएच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात झालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे दुग्ध व्यवसायात भेसळ करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सोलापूर तुकाराम मुंढे एफडीएची कारवाई : 'अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज'वर छापा

सांगोला तालुक्यातील जवळा येथे ‘अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज’ (Ajinkyaraana Milk Industries) नावाचं एक मोठं दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ केली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने या केंद्रावर अचानक छापा टाकला.

या छाप्यात तब्बल 15 लाख रुपये किमतीचा 37 हजार 532 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला. दुधाचा हा अवाढव्य साठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं समोर आल्याने अधिकाऱ्यांनी कोणताही वेळ न घालवता हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट केला.

Sangola Milk Adulteration : दूध केंद्र तातडीने बंद करण्याचे निर्देश

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या दुधाचे एकूण चार वेगवेगळे नमुने (Samples) अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कायदेशीर आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने हे ‘अजिंक्यराणा दूध संकलन केंद्र’ तातडीने बंद करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. दुग्धजन्य पदार्थांमध्ये किंवा दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ सहन केली जाणार नाही आणि यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीने राज्यभरातील भेसळखोरांचे धाबे मात्र आता चांगलेच दणाणले आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.