TVK आमदाराला छेडछाडीप्रकरणी अटक

महिला अधिकाऱ्याच्या लैंगिक छळवणुकीचा आरोप

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत सत्तेवर असणाऱ्या टीव्हीके या पक्षाचे आमदार अरुल विघ्नेश यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात एका महिला आयएएस अधिकाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. तामिळनाडू सरकारने या प्रकरणी कारवाई करण्यास विलंब केल्याने मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.

आमदार अरुल विघ्नेश यांनी आपल्याला अश्लील आशयाचे संदेश व्हॉटस्अॅपवरुन पाठविले. तसेच ते रात्री आपल्या अधिकृत निवासस्थानी मद्यधुंद अवस्थेत आले होते. तसेच त्यांनी अयोग्य अशा प्रकारच्या हालचाली आपल्या विरोधात केल्या, असे अनेक आरोप या महिला अधिकाऱ्याकडून करण्यात आले आहेत. विघ्नेश यांनी हे आरोप नाकारले आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालयात असून उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारवर, कारवाईस विलंब केल्याप्रकरणी ताशेरे ओढले होते. त्यानंतर, तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली.

द्रमुकची टीका

द्रमुक नेते आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर जोरदार टीकाप्रहार केले आहेत. या महिला अधिकाऱ्याला गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष्य केले जात आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार या महिला अधिकाऱ्यावर ‘कॉम्प्रमाईझ’ करण्यासाठी दबाव आणत आहेत. प्रशासनाने या घटनांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. मद्रास उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतरच प्रशासनाने नाईलाजास्तव कारवाई केली. पहिल्या काही महिन्यांमध्येच नव्या सरकारने आपले खायचे दात दाखविण्यास प्रारंभ केला असून राज्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे आरोप स्टॅलिन यांनी केले आहेत.

द्रमुकमुळे छळवणूक प्रकाशात

लैंगिक छळवणूक प्रकरणी या महिला अधिकाऱ्याने 31 जुलैलाच प्रथम तक्रार नोंदविली होती. तथापि, या तक्रारीकडे लक्ष देण्यात आले नाही. नोव्हेंबरमध्ये द्रमुक खासदार कनिमोझी यांनी या महिला अधिकाऱ्याच्या बाजूने आवाज उठविला. 12 नोव्हेंबरला द्रमुक आणि अद्रमुक या पक्षांच्या नेत्यांनी राज्य पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी स्वतंत्ररित्या केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत:हून या प्रकरणाची नोंद घेऊन तामिळनाडू पोलिस प्रमुखांना या प्रकरणाच्या संदर्भातील सर्व डिजिटल पुरावा सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला होता. तसेच या प्रकरणी कृती अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला होता.

राज्य सरकार चौकशी करणार

आमदार विघ्नेश यांनी आरोप नाकारले आहेत. महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशी करण्याचे आश्वासन देऊन चौकशीला प्रारंभ केला आहे.

Comments are closed.