राम मंदिर लुटणारी ही नवीन बाबर जनता पार्टी, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ओढला आसूड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

”मंदिर वही बनायेंगे ते कशासाठी होतं हे आता कळतंय. यांना मंदिर नव्हतं सुरू करायचं तर लुटालूटीचं दुकान सुरू करायचं होतं. राम मंदिर लुटणारी ही नवीन बाबर जनता पार्टी आहे”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आसूड ओढला. उद्धव ठाकरे यांचा आज परभणी येथे कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व गद्दार खासदारांची सालटी काढली.

”परभणीकरांना धन्यवाद देतोय की त्यांनी आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. जनतेचा काम करणारा महापौर निवडून दिला. आपला महापौर मुसलमान आहे म्हणून माझ्यावर टीका झाली. पण तो आमचा आहे. त्याने शिवसैनिक म्हणून निवडणूक लढवलीय. ज्यांनी माझ्यावर टीका केली की मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मुस्लीम उमेदवार दिला. त्यांनी विधानपरिषदेला नावंदरच्या विरोधात जो निवडून आणला तो कोण आहे. आपण दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी काढू, यांच्या उमेदवारावर कोणते खटले आहेत, तुरुंगात होता का ते काढा आणि एक आपला महापौर आहे ज्याने एका महाराजांच्या किर्तनासाठी जमीनीतलं शेत काढून शेतजमीन दिली. आपण काही केले की बाळासाहेबांचे विचार सोडले. पण तुम्ही शिवसेनेशी केलेली गद्दारी हा बाळासाहेबांच्या विचारांचा घात आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी गद्दार खासदारांचा समाचार घेतला.

”गेल्या वेळी प्रचाराच्या वेळी पाऊस पडला होता. त्या पावसात देखील आपण सभा घेतली होती. एका बाजूला राहुल पाटील होते. तर दुसऱ्या बाजूला गद्दार खासदार होता. मी दोघांचे हात पकडले होते. पण एकाने अजूनही हात पकडून ठेवला आहे तर ते महाशय हात सोडून विमानात बसले आहेत. बदाम खातायत. इथे शेतकरी उपाशी आहे आणि हे सर्व गाढव विमानातून गेले. त्या प्रवासाचे बेशरमपणे यांनी ते व्हिडीओ टाकले. त्यात तो दलाल पण दिसतोय. ज्याने खरेदी विक्री केली तो दलाल, नाक्यावर उभा राहणारा तो दलाल. अरे जनाची नाही तर किमान मनाची वाटू द्या. लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंय यांनी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच खाजगी विमानातून जाण्यासाठी लागणारा पैसा यांच्याकडे आला कुठून, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला.

” माझ्यावर टीका करतायत की उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे की त्यांचा का पक्ष फुटतोय. पण आत्मपरिक्षण सर्वांनी केलं पाहिजे. आमच्या पक्षफुटीची केस चार वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचंही आत्मपरिक्षण झालं पाहिजे. आपल्या चार खासदारांनी जाऊन लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं की कुणीही तुमच्याकडे आलं तर कोणताही निर्णय घेण्याआधी आमचंही म्हणणं ऐकून घ्या. त्या पत्राला त्यांचं उत्तर आलं तेव्हा अरविंद सावंत संसदीय कामकाजासाठी कारगिलच्या दौऱ्यावर होते. ते तिथून 25 ला परत येणार होते. त्याआधीच लोकसभेच्या अध्यक्षांचं फर्मान आलं की 24 तारखेला भेटायला या. सावंतांनी त्यांना विचारलं की मी हा कारगिल दौरा अर्धवट सोडून येऊ का तर ते म्हणाले या. त्यांना कारगिल वगैरेचं, तिथल्या कामाचं काही पडलेलं नाही. त्यांच्या मालकांना पक्ष फोडण्याची घाई झालीय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

”प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत उल्हास बापट, ते म्हणालेत की शेड्यूल टेन नुसार लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे. जनता मतदार म्हणजे पक्ष. दोन तृतीयांश सभासद ते जर का इकडून तिकडे गेले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही असे उल्हास बापट म्हणाले. घटनेत लिहलं आहे जेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायचा निर्णय घेतो तेव्हा त्याला दोन तृतियांश लोक प्रतिनिधींचा पाठिंबा असेल तर तो होतो. ते दोन तृतियांश प्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. कायद्याचं राज्य देशात असेल तर ते सहाचे सहा खासदार बाद झाले पाहिजेत. मला अजुनही लोकसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. कारण शेवटी तुम्ही कायदा पाळला नाही तर तुम्ही जनतेला सांगू शकणार नाहीत की कायदा पाळा. सुरुवात वरून व्हायला हवी. बाबासाहेबांनी आपल्याला जी घटना दिलेली त्यानुसार जे योग्य आहे ते योग्य करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांना दिला. अधिकार आणि मर्जीमध्ये फरक आहे. मर्जी नाही मानणार आम्ही. कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत, असा माझा विश्वास आहे. त्यांना मला हात जोडून सांगायचं आहे की घटनेत दिलं आहे त्याचं उल्लंघन तुमच्या सारख्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने करता कामा नये. नाही तर इतिहासात जशी आमची न्याय देणारे म्हणून रामशास्त्रींची प्रभुणेंची नोद झालीय. तशी तुमची घटना तोडणारे लोकसभा अध्यक्ष म्हणून नोंद होऊ देऊ नका”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षांना सुनावले.

Comments are closed.