दिल्लीत राज ठाकरेंची चर्चा; राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray And Rahul Gandhi Meeting: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray And Rahul Gandhi Meeting) यांची एक स्वतंत्र बैठक झाली. काल (7 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 30 मिनिटे चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय समीकरणावर आणि राज ठाकरेंसोबतच्या आघाडीवरही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. यासह सुप्रिया सुळे, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची वेगळी बैठक झाली.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय?
काही दिवसांआधी शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनासाठी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी मुलाखत घेतली होती. यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय?, असा प्रश्न विचारला होता. शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मविआचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो. मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे. ठाणे स्वतंत्र विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावर मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू- उद्धव ठाकरे
आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’, त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=ldrmorfnbvg
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.