हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा! इथे हुकूमशहा तयार होणार असेल तर त्याला आपल्या देशातच गाडण्यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत; उद्धव ठाकरे यांची गर्जना
बांगलादेशींच्या नावाखाली जर माझ्या देशातील नागरिकांचे मतदानाचे अधिकार काढून घेत असाल तर आज पाऊल उचललं आहे, पुढे हात उचलावा लागेल. अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर बरसले. देशात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेतील घोळ, मतदार यादींमधील गडबड घोटाळ्याचे वृत्त, निवडणूक आयोगातील आयुक्तांमध्ये पडलेल्या फूटीच्या बातम्यानंतर देशातील मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. आपला मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याच्या काळजीतून मुंबईकरांसह महाराष्ट्रातील नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मुंबईत गर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीला उद्देशून भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगातील घोटाळ्यांना लक्ष्य करत जोरदार गर्जना केली.
”हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, धर्माचा, जातपातीचा लढा नाही तर हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आहे. मोदीजी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी MAKE IN INDIA अशी घोषणा दिला होती. पण या Make in india मध्ये जर हुकुमशहा पण आपल्या देशात बनणार असेल तर त्यांना या देशातच गाडण्यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत”, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिला.
”संपूर्ण देशात तेरा कोटी मतदार वगळले आहेत. बंगालमधून, तामिळनाडूतून असं सर्व राज्यातून तेरा कोटी मतदार वगळले. तेरा कोटी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या. इतके मतदार यांनी देशातून वगळले. बंगालमध्ये सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळी जे 30 लाख वगळले गेले त्यांतील काहींनी नंतर अर्ज केले तेव्हा ते वैध ठरले. आता तिथे पोटनिवडणूका आहेत. आता त्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा त्यासाठी ते मतदार सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा न्यायधीशांना दिलं ढकलून. 6 तारखेला निवडणूक आहे आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतो की पोटनिवडणूक आहे आम्ही 5 तारखेला सुनावणी घेऊ. सुनावणी झाली तरी ते मतदार मतदान करू शकणार की नाही काहीच माहित नाही. यांनी सगळ्या संस्था आपल्या ढेंगेखाली कशा घेतल्या त्याचे हे उत्तम उदाहरण आहे” , असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्ञानेश कुमार यांची नेमणूक पक्षपातीपणे
”माझा पहिला आक्षेप ज्ञानेश कुमार यांच्या नेमणूकीलाच आहे. जो आयुक्त संपूर्ण देशाच्या निवडणूकीवर लक्ष ठेवतो त्याची निवडणूक न होता नेमणूक होते. आमच्या देशाच्या राष्ट्रपतींची देखील निवडणूक होते. तर मग निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही? ती नेमणूक का होते? या नेमणूकीच्या समितीवर आधी सरन्यायधीश होते, विरोधी पक्षनेते होते. पण नंतर सरन्यायधींशांना काढून टाकलं व त्यांच्या जागी पंतप्रधानांच्या मर्जीतले मंत्री नेमले गेले. म्हणजेच सध्या या समितीवर अमित शहा आहेत. त्यामुळे त्या कमिटीत आता एक विरोधात दोन झाले आहे. राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांच्या नेमणूकीला विरोध केला पण तरिही त्यांची नेमणूक झाली. त्यांची नेमणूकच पक्षपातीपणे झाली आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.