21 वर्षांनंतर उल्हासनगर पालिका आयुक्तांना मिळणार हक्काचा बंगला, नवीन वर्षात गृहप्रवेश
तब्बल २१ वर्षांनंतर उल्हासनगर पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना हक्काचा बंगला मिळणार आहे. बंगल्याच्या कामाला गती मिळावी यासाठी ठेकेदाराला नोटीस दिली जाणार असून कामावर पालिका अधिकारीही वॉच ठेवणार आहेत. बंगल्याच्या कामासाठी २ कोटी ६५ लाखांचा खर्च येणार आहे. बंगल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गृहप्रवेश करण्याचा मनोदय पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर रिजन्सी अँटिलिया संकुल परिसरात आयुक्तांच्या बंगल्याची उभारणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षी तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, नगररचनाकार विकास बिरारी आणि कनिष्ठ अभियंता संजय पवार यांनी १,८३६ चौरस मीटर क्षेत्रफळात बंगल्याचा आराखडा तयार करून मंजूर केला होता. या प्रकल्पासाठी दोन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी बंगल्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी स्वतः आयुक्त मनीषा आव्हाळे, शहर अभियंता नीलेश शिरसाठे, उपअभियंता संदीप जाधव, कनिष्ठ अभियंता हर्षद प्रधान, सुयेश बांगर यांच्या सोबत बंगल्याच्या कामाची पाहणी केली होती. बंगला तयार होण्याच्या मार्गावर आहे. मात्र कामाला अपेक्षित गती मिळावी आणि बंगल्याचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त आव्हाळे यांनी दिली.
Comments are closed.