नागपुरात रंगणार 7 वर्षांखालील गटाची राष्ट्रीय खुली आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा, स्पर्धेत पाच लाखांची पारितोषिके

भारतातील बुद्धिबळाचे भविष्य असणारे आणि उद्याचे ग्रँडमास्टर बनू पाहणारे चिमुकले बुद्धिबळपटू आता नागपुरात आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नागपूर शहराला प्रतिष्ठित अशा ३९ वी सात वर्षांखालील गटाची खुली आणि मुलींची बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि नागपूर बुद्धिबळ संघटना आयोजित ही स्पर्धा ३० जून ते ४ जुलैदरम्यान होणार आहे. जीएच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे.

नागपूर येथील वाडी-हिंगणा लिंक रोडवरील जीएच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन नागपूरची शान आणि बुद्धिबळ विश्वचषक विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे मानद सचिव निरंजन गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डेप्युटी चीफ आर्बिटर आयएपी पलानीअप्पन, संघटक सचिव भूषण श्रीवास, रायसोनी ग्रुपच्या प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ मृणाल नाईक, जनसंपर्क संचालक अमित गंधारे, आयोजन समितीचे सदस्य एसएस सोमन, विलास म्हात्रे, निनंत पेडणेकर आणि आयए प्रवीण ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निरंजन गोडबोले म्हणाले, “या वर्षीच्या स्पर्धेत भारतातील सर्वात तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. देशातील २० हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे ४०० हून अधिक खेळाडू क्लासिक स्विस सिस्टमनुसार नऊ फेऱ्यांमध्ये आपल्या बुद्धीची चुणूक दाखवतील. प्रत्येक खेळाडूला फिडे वेळेनुसार ९० मिनिटे आणि पहिल्या चालीपासून ३० सेकंदांची वाढीव वेळ दिली जाईल. यजमान महाराष्ट्राचे एकूण ७६ खेळाडू या स्पर्धेत उतरले आहेत.”

“राष्ट्रीय रेटिंग सर्किटमध्ये आधीच आपली ओळख निर्माण केलेले अनेक उच्च मानांकित खेळाडू या स्पर्धेत आपले नशीब आजमावत आहेत. खुल्या गटात तेलंगणचा लावीक राम विस्लावथ (१५९१ रेटिंग) हा या स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू म्हणून खेळत आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकचा बी. भट सात्विक (१५८२), आंध्र प्रदेशचा धार्मिक पंचकटला (१५६३) आणि पश्चिम बंगालचा शिवांश बासू (१५६२) यांचा क्रमांक लागतो. यजमान महाराष्ट्राचे ४७ खेळाडू या गटात असून, अक्षांश श्रीवास्तव (१५५४) पाचव्या मानांकनासह महाराष्ट्राचे आव्हान सांभाळत आहे. मुलींचा गटात पश्चिम बंगालची उध्रिती भट्टाचार्य (१५२९ रेटिंग) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर दिल्लीची आरिणी लाहोती (१५२५) आणि पश्चिम बंगालची अदित्री मजुमदार (१५२१) यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील २९ मुली या गटात असून, आठवे मानांकन मिळालेली एन.एस. लिया कृष्णन (१४३३) महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे, ” असेही गोडबोले यांनी पुढे सांगितले आहे.

७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा ही नेहमीच जागतिक स्तरावर चमकण्यासाठी खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ ठरली आहे. रोख बक्षिसे आणि राष्ट्रीय ट्रॉफीव्यतिरिक्त, या स्पर्धेत दोन्ही गटांतील विजेत्यांना या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या ७ वर्षांखालील गटाची जागतिक आणि आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत अधिकृतपणे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

स्पर्धेची सुरुवात मंगळवार, ३० जून रोजी तांत्रिक बैठक आणि पहिल्या फेरीने होईल, तर ४ जुलै रोजी पारितोषिक वितरण समारंभाने स्पर्धेची सांगता होईल.

Comments are closed.