Iran US War – इराणशी यारी चीनला पडली भारी; बड्या कंपनीवर अमेरिकेकडून निर्बंधांचा बडगा
अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा आणि वाटाघाटी सुरू असतानाच ट्रम्प प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. इराणकडून बेकायदेशीरपणे कच्चे तेल आयात केल्याबद्दल अमेरिकेने चीनमधील एका मोठ्या ऑइल टर्मिनल ऑपरेटरवर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे इराणच्या तेल व्यापारालाही मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकेने चीनमधील क्विंगदाओ हायये ऑइल टर्मिनल या कंपनीवर निर्बंध लादले आहेत. या कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून इराणकडून कोट्यवधी बॅरल कच्चे तेल आयात केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपनीचे अध्यक्ष झिंगचुन ली यांच्यासह हाँगकाँग आणि ब्रिटनमधील 2 जहाज व्यवस्थापन कंपन्यांवरही अमेरिकेने कारवाई केली आहे.
इराणचे तेल चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डार्क फ्लीटला मदत करणाऱ्या कंपन्यांना यात लक्ष्य करण्यात आले आहे. ही जहाजे अनेकदा आपली ओळख लपवून धोकादायक पद्धतीने प्रवास करतात.
इराणचा बेकायदेशीर तेल व्यापार हा दहशतवादाला खतपाणी घालणारा आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण करणारा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. हा महसूल रोखण्यासाठी अमेरिका निर्णायक पावले उचलत आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी माहिती देताना सांगितले.
दुसरीकडे अमेरिकेच्या अर्थ विभागाने सागरी वाहतूक उद्योगाला एक गंभीर इशारा दिला आहे. इराणच्या ताब्यातील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासासाठी जर कोणत्याही कंपनीने इराणला टोल दिला तर त्या कंपनीवरही अमेरिकेचे निर्बंध लादले जाऊ शकतात. दरम्यान, तेलाव्यतिरिक्त अमेरिकेने इराणच्या तीन मोठ्या चलन विनिमय केंद्रांवर आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवरही बंदी घातली आहे. या संस्था दरवर्षी अब्जावधी डॉलर्सच्या व्यवहारांना मदत करत होत्या. ‘पीटीआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इराणवर मोठा हल्ला करण्याची तयारी; आखातात हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव
भर समुद्रात अडकले 41 जहाजं
दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम आहे. अमेरिकेने होर्मुझसह इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या भर समुद्रामध्ये 41 तेलवाहू जहाजं अडकली आहेत. या जहाजांवर जवळपास 6.9 कोटी बॅरल तेल असल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे.
Comments are closed.