परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत

विधान परिषद निवडणूक: परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा “स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार” हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात परभणीत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून जागा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगही वेगाने सुरू झाले आहे.

2018 मध्ये झालेल्या परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेकडून अकोला येथील विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या विरोधात लढलेल्या या निवडणुकीत बाजोरिया यांनी अवघ्या 35 मतांनी विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश केला होता. मात्र, गेल्या आठ वर्षांत त्यांनी परभणी आणि हिंगोली जिल्ह्याशी सातत्याने संपर्क ठेवला नाही, असा आरोप आता स्थानिक पातळीवर जोर धरू लागला आहे.

विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरही “स्थानिक उमेदवारालाच संधी द्या” अशी मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून बाहेरच्या उमेदवाराला पुन्हा संधी देऊ नये, अशी भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, परभणीत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या मेळाव्याला विप्लव बाजोरिया अनुपस्थित राहिल्याने चर्चांना अधिक उधाण आले. आधीच त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त होत असताना या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

माझे काम सामन्यांशी नाही तर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्याशी आहे मी त्यांच्या संपर्कात आहे. मुंबईला असल्याने मेळाव्याला उपस्थित राहता आले नाही, अशी प्रतिक्रिया विप्लव बाजोरिया यांनी दिली.

यासंदर्भात विप्लव बाजोरिया यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात, “माझे काम सामान्य नागरिकांशी संबंधित नसून नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी आहे. विधान परिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर आधारित असते. त्यामुळे त्यांना विचारा मी त्यांच्या संपर्कात आहे की नाही, त्यांना निधी दिला आहे की नाही?”

मात्र विप्लव बाजोरिया यांच्या या वक्तव्यावरूनही आता नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आजच्या मेळाव्यालाही मी मुंबईत असल्याने उपस्थित राहू शकलो नाही असे त्यांनी म्हटले आहे.

उमेदवार स्थानिक असावा, संपर्कप्रमुखांची मागणी

परभणीची जागा पारंपरिक शिवसेनेची आहे, ही जागा शिवसेना लढवणार. शिवसेना ती जागा राखणार आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जो उमेदवार देतील शिवसैनिक असावा, स्थानिक असावा. त्या उमेदवाराला या ठिकाणी इथली जनता आणि इथले मतदार आणि इथले शिवसैनिक पसंती दिल्याशिवाय राहणार नाही असे शिवसेनेचे परभणी संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी दिली आहे.

बाजोरियांवर असलेल्या नाराजी बाबत जाधव यांना विचारले असता निश्चित या नाराजीची दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि योग्य तो उमेदवार देतील असे ते म्हणाले. तसेच जर सहा वर्ष इथे उपस्थित राहत नसतील तर मेळाव्याला कसे येतील? ते कुठे आहेत याबद्दल मला काही माहिती नाही असं संपर्कप्रमुख आनंद जाधव म्हणाले.

एकूणच, परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीत यावेळी केवळ पक्षीय समीकरणे नव्हे तर स्थानिक चेहरा की बाहेरील उमेदवार? हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.