देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला जाणार? मुख्यमंत्र्यांनी दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
मुंबई : मुख्यमंत्र्यांसाठी असलेलं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला. मात्र, देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारुन 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण, अद्यापही तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहत आहेत. त्यामुळे, वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री राहात नसल्यावरुन राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा घडत आहेत. त्यातच, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी आज वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन अनेक दिवस उलटल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस सागर बंगला सोडून वर्षा बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. आता, संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. तसेच, माझ्या मुलीची परीक्षा संपल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावरील जादटोण्यासंदर्भात गंभीर दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊतांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री व सध्या वर्षा निवासस्थानी राहणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीही उत्तर दिलं. या गोष्टींचा सर्वात जास्त अनुभव त्यांनाच आहे, असे शिंदेंनी म्हटलं. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती देत, आपण वर्षा बंगल्यावर राहण्यास कधी जाणार हे स्पष्ट केलं. ”एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथं जायचं आहे, तिथं बंगल्यावर काही छोटी-मोठी कामंही होणार आहेत. दरम्यानच्या काळात माझी मुलगी 10 वी मध्ये शिकत आहे, ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिथं शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथं लगेच शिफ्ट झालो नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, इतक्या वेड्यासारख्या चर्चा, माझ्या स्तराच्या माणसाने अशा प्रश्नावर उत्तरही देऊ नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.
काय म्हणाले होते संजय राऊत
भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत. आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. मात्र, वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबुज रंगली आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल, त्याचं मुख्यमंत्रीपद टिकू नये, यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंगं वर्षा बंगल्यावर पुरुन ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, पण ते अधिकृत निवासस्थानी जायला तयार नाहीत. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
अधिक पाहा..
Comments are closed.