राष्ट्रकुल विजेत्या मायशाची जोरदार चाल; राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मानांकितांची सलामी
एसबीआय लाइफ महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकितांनी पहिल्याच फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मायशा परवेझने विजयी सलामी देत स्पर्धेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याचे संकेत दिले.
दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत 7, 11 आणि 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या सहा गटांत तब्बल 417 बुद्धिबळपटू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. इंडियन चेस स्कूल आयोजित ही सात फेऱ्यांची स्पर्धा 6 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.
15 वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित एएफएम मायशा परवेझ (1991) हिने अनन्या जयदीप धमालवर सहज मात करत विजेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलची प्रतिनिधी असलेल्या मायशाकडून आता पुढील फेऱ्यांतही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. याच गटात प्रणिता भावा आणि खानक पहारिया यांनीही विजयाची नोंद केली.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात समविद पासबोला, विहान अग्रवाल आणि रायन मर्चंट यांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवत विजयी कूच केले. 11 वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान शाळेचा अव्वल मानांकित लक्ष दिघे, तर मुलींच्या गटात त्वेषा जैन यांच्याकडे सर्वांचे लक्ष असेल. सात वर्षांखालील गटात इवान दुबे आणि लिया कृष्णन यांना अग्रमानांकन मिळाले आहे.
काही अनपेक्षित निकाल आणि बरोबरीचे डाव वगळता पहिल्या फेरीत मानांकितांचा दबदबा कायम राहिला. आंतरराष्ट्रीय पंच पी. बी. भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू असून दुसऱया फेरीत आघाडीच्या बुद्धिबळपटूंची खरी कसोटी लागणार आहे.
Comments are closed.