छगन भुजबळांना अचानक राज्य मंत्रिमंडळात का घेतलं? ही आहेत तीन कारण
छगन भुजबल शपथ घेण्याचा सोहळा: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षितपणे वर्णी लागली आहे. सोमवारी रात्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांकडून राजभवनातील शपथविधीचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार मंगळवारी सकाळी 10 वाजता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राजभवनात 50 जणांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील. यानंतर त्यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारच्या स्थापनेवेळी मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी यावरुन उघडपणे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांविरोधात दंड थोपटले होते. परंतु, राज्य मंत्रिमंडळात कोणतेही स्थान रिक्त नसल्याने छगन भुजबळ यांच्या या नाराजीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परंतु, आता कोणालाही अपेक्षा नसताना महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. छगन भुजबळ यांना इतक्या अचानकपणे मंत्रिमंडळात का घेतले, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Maharashtra Cabinet: राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा
अलीकडच्या काळात निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात राज्यातील ओबीसी व्होटबँकेचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट या तिघांनाही ओबीसी व्होटबँकेच्या ताकदीची जाणीव आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला मंत्रिमंडळात पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड, अदिती तटकरे, अतुल सावे यांच्यासारख्या बड्या ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. परंतु, यापैकी कोणालाही छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ओबीसींचा नेता म्हणून ओळखले जात नाही. हे सर्व नेते विशिष्ट प्रदेशात आणि विशिष्ट जातीय राजकारणापुरते प्रभावी ठरतात. याउलट छगन भुजबळ यांना संपूर्ण राज्यभरात ओबीसी नेता म्हणून ओळखले जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून स्वत:ला ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट गेले आहे. याशिवाय, राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला सर्वात आधी विरोध करण्याची हिंमतही छगन भुजबळ यांनी दाखवली होती. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावरुन भुजबळांवर टीकेची झोडही उठवली होती. मात्र, मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असतानाही छगन भुजबळ जराही डगमगले नव्हते. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीचा विरोध केला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनचा भर असताना कोणताही नेता त्यांच्याविरोधात जात नव्हता. तेव्हा छगन भुजबळ हे खंबीरपणे दंड थोपटून उभे राहिले होते. यानंतर पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके यांच्यासारख्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणाची भूमिका मांडायला सुरुवात केली होती. त्यामुळे आजदेखील छगन भुजबळ हेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. याच कारणामुळे छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला असण्याची शक्यता आहे.
Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. यामध्ये मुंबई, पुणेनाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या बड्या महानगरपालिकांचाही समावेश आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत जातीचा फॅक्टर आणि पर्यायाने ओबीसी फॅक्टर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अशावेळी छगन भुजबळ यांच्यासारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळातून दूर ठेवल्यास राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी योग्य टायमिंग साधत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचे बोलले जात आहे.
Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी भुजबळांचे उत्तम संबंध
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातील संबंध उत्तम आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. छगन भुजबळ यांनी स्वत: याबाबत माहिती दिली होती. माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते त्यांनी आग्रहा धरला होता ते देखील मी निश्चित कन्फर्म करून घेतला आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावे लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले उत्तम संबंध हेदेखील एक कारण मानले जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=fdai5p9mlbe
आणखी वाचा
छगन भुजबळांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?
अधिक पाहा..
Comments are closed.