चडचणमधील 21 कोटींच्या बँक दरोड्याचं मंगळवेढा कनेक्शन; जुन्या कारच्या पत्र्यावर 6 किलो सोनं

सोलापूर : कर्नाटकातील चाडचन येथे असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर (bank) पडलेल्या धाडसी दरोड्यातील मंगळवेढा (Solapur) कनेक्शन समोर आले आहे. या दरोड्यात वापरण्यात आलेली मारुती कार ही देखील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला गेल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे आता या दरोड्यात मंगळवेढा तालुक्यातील कोणी आहे का? हा नवीन अँगल पोलिसांना (Police) मिळालेला आहे. पोलिसांनी कार चोरीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून दरोडा प्रकरणातील मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पोलीस कायद्यानुसार ही कार चाडचन पोलिसांकडून तपासासाठी लवकरच ताब्यात घेणार आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेवरील चाडचन येथे 15 सप्टेंबर रोजी टाकण्यात आलेल्या धाडसी दरोड्यात जवळपास 21 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्यात वापरलेली मारुती कार ही मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावातून चोरण्यात आल्याचे आता समोर आले आहे. ही कार मंगळवेढ्यातून 8 सप्टेंबर रोजी चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरोड्यात ही कार वापरण्यापूर्वी चोरट्यांनी या कारची क्रमांक प्लेट बदलली होती. ही कार मूळ साताऱ्याच्या मालकाची असून त्याने कोल्हापूरच्या एजंट माध्यमातून मंगळवेढ्यातील आंधळगाव येथे त्याची विक्री केली होती. मात्र, ही विक्री केवळ करार करुन केल्याने अजून कागदपत्रे आंधळगावच्या मालकाच्या नावावर झाली नव्हती. दरम्यान 8 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळेला आंधळगाव येथून या मालकाच्या घरासमोरून ही गाडी चोरीला गेली होती. पोलीस आता या कार चोरांची सीसीटीव्ही फुटेज शोधू लागले असून ते मिळाल्यास चाडचन दरोडा प्रकरणात मोठा खुलासा होऊ शकेल.

6 किलो सोनं, 40 लाख रोकड जप्त

मंगळवेढ्यातील आंधळगाव येथून 8 सप्टेंबर रोजी चोरलेल्या कारचा वापर 16 सप्टेंबर रोजी झालेल्या चाडचन येथील बँक दरोड्यात करण्यात आला होता. त्यानंतर दरोडा टाकून पळून जाताना दरोडेखोरांची गाडीही मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे एका दुचाकीला धडकल्याने पोलिसांना मिळाली होती. या गाडीतही काही रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून आले आहेत. मात्र, याचा नेमका आकडा कर्नाटक पोलिसांकडे आहे. त्यानंतर केवळ दोनच दिवसात हुलजंती येथील एका जुन्या घराच्या पत्र्यावर दरोड्यातील लुटलेल्या ऐवजाचा काही मुद्देमाल असलेली बॅग पोलिसांना सापडली. त्यामध्ये 6 किलो सोने आणि जवळपास 40 लाख रुपयाची रोकड मिळाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही बॅग कर्नाटक पोलिसांनी सील करून घेऊन गेल्याने याचाही नेमका आकडा अजून समोर आलेला नाही.

दरम्यान, चाडचन येथे दरोड्यात वापरण्यात आलेली कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला जाणे, त्यानंतर दरोडा टाकून पळून जाताना ही कार मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे सापडणे आणि दरोड्यातील काही किमती मुद्देमाल असणारी बॅग देखील हुलजंती येथे सापडणे यावरून आता चढचण दरोड्यात मंगळवेढाचे नवीन कनेक्शन समोर आलं आहे.

हेही वाचा

रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे ‘रेल नीर’च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त

आणखी वाचा

Comments are closed.