गणेश नाईक म्हणाले, नालायकांच्या हाती नवी मुंबईची सत्ता नको, तर मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का


मुंबई: गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षाचं नवं रणांगण ठरत आहे. वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये (Shivsena Leader) चांगलाच कलगीतुरा रंगला असून नाईक सातत्याने आक्रमक सूर धरताना दिसत आहेत. दोन्ही गटातील वाद उघडपणे समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता थेट शिंदे गटावर हल्लाबोल करत खरपूस टीका केली. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाईकांना चांगलंच उत्तर दिलं आहे.

Uday Samant: मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का?

गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना सामंत म्हणाले, हे सगळं बोलत असताना हेच मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का? हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं. त्यानंतर मग डायरेक्ट इनडायरेक्ट आरोप प्रत्यारोप करावेत. आता मला वाटतं काही लोकांना वाण नाही पण गुण लागतो, तसा शिवीगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागला आहे. ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये. नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा. आमच्या खासदारांना बोलता येत नाही का? आमच्या तिथल्या जिल्हाप्रमुखांना बोलता येत नाही का? पण साहेबांचं सांगणं असतं भाजपमध्ये काम करणाऱ्या नेत्यांवर टीका करू नका आणि या गोष्टी सर्वांनीच सांभाळल्या पाहिजेत असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Uday Samant: उठसूट एकनाथ शिंदेवर टिका खपवून घेणार नाही

पुढे सामंत म्हणाले, नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, म्हणजेच त्याच्या हाती सत्ता दिली जाणार नाही. समन्वय समितीत ही संवाद साधण्यासाठी आहे. उठसूट एकनाथ शिंदेवर टिका खपवून घेणार नाही, नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ घ्यावी. ज्याची ज्या पद्धतीने कुवत असते त्याला ते पद मिळते. आमच्या खासदारांनाही बोलता येत नाही का? पण साहेब सांगतात की मित्र पक्षावर बोलू नका म्हणून सर्व शांत आहेत, असंही उत्तर सामंतांनी दिलं आहे.

काय म्हणाले होते गणेश नाईक?

शिंदेंना टोला लगावत गणेश नाईक म्हणाले की, तुम्ही भविष्याचा विचार करणार की नाही. नवीन एफएसआय लागू झाला तर या शहराची वाट लागेल. आज नवीन मुंबईत काही ठिकाणीच पाणी साचतं, तुंबापूरी होत नाही. कारण आपण या शहरांच्या नाल्याची रचना तशी केली आहे. पण जर नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर या शहराचा वाटोळ झालं म्हणायचं. आपण जबाबदारीने हे विधान करत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. आपल्या मनात कुणाविषयी द्वेष नाही. गणेश नाईक सुखी आहे. जो पैसा माझी झोप उडवील तो पैसा मला नको आहे. आयटीचे लोकं येतील, लुटारू येतील, सीबीआय येईल. सुखाची झोप मिळते, मग असा पैसा काय कामाचा, माझा हात साफ आहे आणि मन पण साफ आहे, असा टोला त्यांनी शिंदेंना नाव न घेता लगावला होता.

https://www.youtube.com/watch?v=SGW-dvddasw

आणखी वाचा

Comments are closed.